मुंबई - मुंबई - भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली होती. बाबासाहेबांच्या या भेटीची नोंद इतिहासात ठेवण्यात आली आहे. बाबासाहेबांच्या भेटीनंतर आंबेडकर अनुयायांनी मोठ्या प्रमाणात या विजयस्तंभाला भेट देण्यास सुरुवात केली. तर, बहुजन समाजातील भारतीय सैन्याचे अधिकारी, सैनिक, उच्चपदस्थ व्यक्ती मोठ्या प्रमाणात या विजयस्तंभाला भेट देऊ लागले. बाबासाहेबांच्या भेटीनंतर येथे जाणाऱ्या अनुयायांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली.
महार बटालियनच्या शौर्याचे प्रतिक म्हणून ब्रिटिशांनी हा विजयस्तंभ उभारला आहे. त्यानंतर, बाबासाहेबांनी सर्वप्रथम 1927 मध्ये या विजयस्तंभाला भेट दिली. या भेटीनंतर आंबेडकर अनुयायी मोठ्या प्रमाणात या शौर्य स्तंभाला भेटी देऊ लागले. त्यामुळे महार बटालियनच्या लढाईचा इतिहास सर्वदूर पसरत गेला.
भीमा कोरेगाव 'विजयस्तंभाचा इतिहास', जाणून घ्या 1818 मध्ये काय घडलं ?
विजयस्तंभाची निर्मिती -
ज्या महार अस्पृश्य सैनिकांनी समतेच्या, न्यायाच्या हक्कासाठी या लढाईत प्राणांची आहुती दिली. त्यांच्या व त्या दिवसाच्या पवित्र स्मृतिप्रीत्यर्थ ब्रिटिशांनी भीमा नदीच्या तीरावर कोरेगाव येथे एक भव्य ऐतिहासिक असा क्रांतिस्तंभ निर्माण केला. समतेच्या या लढाईत शौर्य गाजवून वीरमरण पत्करलेल्या सैनिकांची नावे या स्तंभावरील भव्य अशा संगमरवरी शिलेवर मराठी व इंग्रजी भाषेत कोरली आहेत. सैन्याच्या विजयाचे प्रतिक असल्यामुळे या स्तंभाला विजयस्तंभ असे म्हटले जाऊ लागले.
विजयस्तंभाला डॉ. आंबेडकरांची मानवंदना -
1 जानेवारी 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या क्रांतिस्तंभाला प्रथम भेट दिली. आपल्या सहकाऱ्यांसमवेत विजयस्तंभाला मानवंदना देऊन त्यावर्षी स्मृतिदिन साजरा केला. यावेळी महार बटालियनच्या शौर्याचे कौतुक बाबासाहेबांनी केली. या ऐतिहासिक मानवंदनेनंतर दरवर्षी 1 जानेवारीला लष्करातील सेवानिवृत्त अधिकारी व सैनिक तसेच मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी कुटुंबासह विजयस्तंभाला भेट देऊन मानवंदना देऊन आदरांजली अर्पण करतात.