पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेतीविषयक धोरणाचा स्वीकार केला असता तर आज देशातील शेतकऱ्यास रस्त्यावर यावे लागले नसते असे प्रतिपादन रिपब्लिकन मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे यांंनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ नोव्हेंबरच्या महापरिनिर्वाणदिनी झालेल्या अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. जवाहरलाल नेहरू दिल्ली विधापीठाचे प्रा. मिलिंद आव्हाड, रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष महेंद्र कांबळे, मातंग आघाडी उपाध्यक्ष लखन कांबळे, खंडू शिंदे, विरेंन साठे आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. आंबेडकरांंनी देशातील शेतीचा बारकाईने विचार करून धरणे, नदीजोड प्रकल्प अशा अनेक योजना दिल्या. कोकणातील शेतकऱ्यांसाठी खोतीदारी पध्दती विरोधात त्यांंनी १० जानेवारी १९३८ मध्ये महाराष्ट्र विधिमंडळावर मोर्चाही काढला होता. त्यांच्या विचाराकडे दुर्लक्ष झाले, त्यामुळेच देशातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली असे, मत यावेळी व्यक्त करण्यात आले.