पुणे : शहरी गरीब वैद्यकीय साहाय्य योजनेला वर्गीकरणातून निधी उपलब्ध करून देण्याच्या विषयावरून सर्वसाधारण सभेत काँग्रेसचे गटनेते आबा बागुल व माजी उपमहापौर डॉ़ सिध्दार्थ धेंडे यांच्यात चांगलीच तू-तू, मैं-मैं झाली़ बागुल हे विमा कंपनीचे एजंट आहे, असा आरोप करणाऱ्याºडॉ़ धेंडे यांच्यावर पलटवार करीत बागुल यांनी, डॉ. धेंडे हे शहरातील खासगी हॉस्पिटलचे एजंट असल्याचा आरोप केला़
दरम्यान, या दोघांच्या आरोप-प्रत्यारोपात महापौर मुरलीधर मोहोळ यांनी, प्रशासनाने शहरी गरीब योजनेविषयी सविस्तर माहिती सादर करावी, अशी सूचना करून या वादावर पडदा टाकला़
आजच्या आॅनलाईन सर्वसाधारण सभेत सन २०२०-२१ च्या आर्थिक वर्षासाठी अंशदायी वैद्यकीय साहाय्य योजना व शहरी गरीब वैद्यकीय साहाय्य योजनेसाठी १८ कोटी ७२ लाख रूपये वर्गीकरणातून उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून सादर झाला होता़ यावर आबा बागुल यांनी, कोट्यवधी रूपये खर्च करून शहरातील खासगी हॉस्पिटलची तिजोरी भरण्यापेक्षा शहरातील गरीब नागरिकांचा आरोग्य विमा का काढला जात नाही, याबाबत प्रश्न केला़ प्रशासनानेही तसे जाहीर केले, पण अद्यापही त्याबाबत कोणताही ठोस निर्णय का घेतला नाही, अशा प्रश्नांची सरबत्ती सुरू करून, ही योजना केवळ खासगी हॉस्पिटलच्या फायद्यासाठी राबविली जात आहे का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला़
यावर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी ही योजना शहरातील गरिबांसाठी किती फायदेशीर आहे याचे दाखले देत, केवळ मोघम आकडे घेऊन आरोप करणारे बागुल हे विमा कंपनीचे एजंट म्हणून काम करीत असल्याचा आरोप केला़ तेव्हा बागुल यांनीही डॉ़ धेंडे हे शहरातील डॉक्टर व खासगी हॉस्पिटलचे एजंट असल्याचा आरोप केला़
------
चौकट
आयुक्त विक्रम कुमार यांनी यावेळी शहरातील नागरिकांचा आरोग्य विमा काढण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून अभ्यास चालू असल्याचे सांगितले़ केंद्राची व राज्याची आरोग्य योजना यांचा विचार करून शहरातील किती नागरिकांचा विमा काढावा लागेल याचा प्रस्ताव आम्ही लवकरच स्थायी समितीसमोर सादर करणार असल्याचे सांगितले़ तर शहरी गरीब वैद्यकीय साहाय्य योजनेतून या वर्षात १४ हजार ५०० गरीब नागरिकांनी लाभ घेतला असल्याची माहितीही या वेळी प्रशासनाकडून देण्यात आली़