पुणे : राजहंस प्रकाशन आणि डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृति-संशोधन केंद्र यांच्या सहयोगाने देण्यात येणारा ’श्री. ग. माजगावकर पुरस्कार’ यंदाच्या वर्षी बौद्ध धर्म आणि तत्त्वज्ञानाचे अभ्यासक्र, ज्येष्ठ संस्कृतज्ञ डॉ. श्रीकांत बहुलकर यांना जाहीर झाला आहे. चाळीस हजार रुपये, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
दि. १ ऑगस्ट हा ‘माणूस’कार श्री.ग.मा. यांचा जन्मदिन. सन २०१९ मध्ये त्यांच्या जयंतीदिनी हा पुरस्कार सुरु झाला. दरवर्षी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्रातल्या एका विचारवंताला अथवा ज्ञानोपासकाला श्री. ग. माजगावकर पुरस्काराने सन्मानित केले जाते. श्री.ग.मा. यांच्या जन्मशताब्दी वर्षात २०२९ मध्ये या पुरस्काराची सांगता करण्यात येईल, अशी माहिती डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृति-संशोधन केंद्राने दिली.
यंदाचे पुरस्कार्थी डॉ. बहुलकर हे गेली ४० वर्षे अध्ययन क्षेत्रात कार्यरत असून, प्रामुख्याने संस्कृत व बौद्ध विद्येचे अभ्यासक आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली व बौद्धविद्या विभागात ते संलग्न प्राध्यापक आहेत. वेद, संस्कृत, पाली, बौद्धविद्या अशा विविध विषयांवरील त्यांच्या संशोधनाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. प्रा. बहुलकर यांनी विविध देशांमधील ख्यातनाम विद्यापीठांमध्ये अध्यापन केले आहे. त्यांची आजपर्यंत विविध विषयांवरील १२ पुस्तके प्रकाशित झाली असून सुमारे ६५ संशोधनपर लेख लिहिले आहेत.