पुणे :डॉ. बळवंत पंढरीनाथ घाटपांडे हे नाव ऐकलं की फार काही वेगळं वाटत नाही. मात्र पुढे वय १०५ वर्ष सांगितल्यावर मात्र सगळ्यांचेच डोळे विस्फारतात. कारण पुण्यात राहणाऱ्या डॉ घाटपांडे यांनी शुक्रवारी वयाच्या १०५व्या वर्षात पदार्पण केले आहे. आणि मुख्य म्हणजे नियमित व्यायाम आणि योग्य आहार या सूत्रीच्या आधारावर ते आजही निरोगी आणि स्वावलंबी आयुष्य जगत आहेत. शतकाचा बदल अनुभलेले डॉ घाटपांडे आजही दवाखान्यात नियमित येऊन रुग्णांची तपासणी करतात. कोणच्याही मदतीशिवाय चालणारी त्यांची ही दिनचर्या विशेषच मानायला हवी.
घाटपांडे यांचा जन्म जुन्नरजवळील आळे गावातला. लहानपणी डॉक्टर बनण्याचा निश्चय केल्यावर त्यांनी तो प्रचंड चिकाटीने अमलात आणला. त्यात तीनवेळा अपयश आल्यावरही त्यांनी ऍडमिशन मिळवली आणि मागील ८२ वर्षे त्यांचीरुग्णसेवा अविरतपणे सुरु आहे. नव्या काळातले तंत्रज्ञान आत्मसात करण्यासोबत जुन्याचा ऋणानुबंधही त्यांनी तोडला नाही . काहीही झालं तरी रोज अर्धा तास व्यायाम, सूर्यनमस्कार, कवायत करण्यास ते विसरत नाहीत. त्याशिवाय साधे, सात्विक जेवण घेताना अर्धा लिटर दुधही ते पितात. घाटपांडे यांना तीन मुले असून तिघेही वैद्यकीय क्षेत्रातच आहेत. या सगळ्यांशी गप्पा मारायला, त्यांची नियमित चौकशी करायला ते विसरत नाहीत. त्यामुळे त्यांच्या रुग्णांसह सगळ्यांना ते हवेहवेसे वाटतात. रुग्णांच्या तर तीन पिढ्याही त्यांनी तपासल्या आहेत. घाटपांडे यांची पदवीही वेगळी असून ती एल. सी. पी. एस. अशी आहे. याचे पूर्ण रूप लायसन्स इन मेडिकल प्रॅक्टिस अँड सर्जरी असल्याचे ते सांगतात. पुण्यात अभ्यास करून मुंबईत परीक्षा देऊन त्यांनी ही पदवी मिळवली.
बदलेला काळ, झालेले बदल याविषयी त्यांची काही मते आहेत. ते म्हणतात, ''गेल्या १००वर्षात समाज घडलाही आणि बिघडालाही. आता आजार वाढले तशा डॉक्टरांच्या शुल्कातही वाढ झाली आहे. मात्र रुग्णांना बर करायला नवनवीन तंत्रज्ञान आल्यामुळे जगणं सोपं झालं आहे. समाजात मात्र पूर्वी जो सलोखा, एकमेकांविषयीचे प्रेम, आदर, जिव्हाळा होता तो आता लोप पावला आहे. त्यामुळे आपण काही गोष्टीत तरी जुने ते सोने म्हणून नाती जपायला हवीत''
गांधी हत्या आणि पानशेतपूर स्मरणात
आयुष्यातल्या दोन महत्वाच्या आठवणी विचारल्यावर डॉ. घाटपांडे काहीसे खिन्न होतात. १९४८साली झालेली गांधीहत्या आणि १०६१साली पानशेतच्या पूराच्या आठवणी कधीही विसरू शकत नसल्याचे ते म्हणतात . संपलेले पुणे आणि घरादाराची राखरांगोळी आजही अंगावर काटा उभा राहत असल्याचे ते सांगतात.