पुणे: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १९२३ साली ‘लंडन स्कूल ऑफ इकाॅनॉमिक्स’कडून पीएच. डी. पदवी मिळाली होती. ‘प्रॉब्लेम ऑफ रूपी’ हे त्यांच्या ग्रंथाचे नाव होत. त्या घटनेला यंदा १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या अनुषंगाने बाबासाहेबांचा विदेश प्रवास जिथे जिथे झाला, त्या त्या देशांमध्ये डॉ. बाबासाहेबांवर संशोधन करण्यात येणार आहे. तसेच ‘बार्टी’च्या माध्यमातून लंडन मादाम येथे बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहिती ‘बार्टी’चे महासंचालक सुनील वारे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्ताने शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तसेच विविध संस्था, संघटनांच्या वतीनेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन, प्रशिक्षण संस्था (बार्टी)तर्फे दरवर्षी विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात आंबेडकर जयंती साजरी केली जाते. यंदा संस्थेकडून जयंतीनिमित्त ‘घर घर संविधान’ ही मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती ‘बार्टी’चे महासंचालक वारे यांनी दिली.
१० हजार संविधान ग्रंथांचे वाटप : १ लाख प्रतींचे वाटप करण्याचा संकल्प
भारताचा सर्वात मोठा ग्रंथ हा संविधान असल्याने संविधानामधील विचार नागरिकांपर्यंत घरोघरी पोहाेचावेत, या उद्देशाने संविधानाच्या स्पेशल प्रिंटिंगची ऑर्डर देण्यात आली आहे. आता १० हजार संविधान ग्रंथ उपलब्ध होणार आहेत. हे संविधान ग्रंथ घराघरापर्यंत पोहोचावे या उद्देशाने ही मोहीम सुरू केली असून १ लाख प्रती वाटप करण्याचा संकल्प आहे. या योजनेचा पहिला भाग म्हणजे जो मागेल त्याला संविधान देण्यात येईल. यानंतर समतादूतांच्या माध्यमातून हे ग्रंथालय गावोगावी जाऊन देण्यात येणार आहे.
परकीय भाषेत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन नोकरीची संधी
- जागतिकीकरणामुळे विदेशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यासाठी बार्टी कौशल्य विभागामार्फत ओव्हरसीस प्लेसमेंट प्रोग्रॅम राबविण्यात येणार असून त्यासाठी जपानी, फ्रेंच, स्पॅनिश, जर्मन, रशियन, इत्यादी भाषांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ज्यामुळे परदेशात शिक्षण आणि नोकरी करणे सुलभ होईल.- बाबासाहेबांच्या विदेश प्रवासावर संशोधन : बाबासाहेबांचा विदेश प्रवास जिथे जिथे झाला, त्या त्या देशांमधील भाषेत संशोधन करण्यात येणार आहे. बार्टीच्या वतीने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच मुलांना ट्रेनिंग, प्लेसमेंट, स्किल डेव्हलपमेंटच्या अंतर्गत उपक्रम घेण्यात येणार आहेत. या मुलांना ट्रेनिंग देऊन विविध देशांत पाठवण्यात येणार आहे.
पुस्तकांवर १५ टक्के सूट
महापुरुषांची विविध प्रकारची पुस्तके व ग्रंथ उपलब्ध आहेत. भारतीय संविधानाचे ४१६ रुपये किमतीचे पुस्तक फक्त ६४ रुपयांमध्ये उपलब्ध असून, ते मागेल त्याला मिळणार आहे. अशा प्रकारे सर्व पुस्तकांवर ९५ टक्के सूट देऊन छापील किमतीवर फक्त १५ टक्के रक्कम देऊन पु्स्तक खरेदी करता येईल.