पुणे : राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेच्या (नॅक) कार्यकारी अध्यक्षपदाचा राजीनामा डाॅ. भूषण पटवर्धन यांनी दिला आहे. यासंदर्भात पदाचा राजीनामा देत असल्याबाबतचे पत्र त्यांनी रविवारी रात्री उशिरा यूजीसीचे अध्यक्ष जगदेश कुमार यांना पाठविले आहे.
नॅक अंतर्गत होणाऱ्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून नॅकचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी राजीनामा देणार असल्याच्या इराद्याचे पत्र यूजीसीला काही दिवसांपूर्वी पाठवले हाेते. त्यानंतर यूजीसीने तत्काळ त्यांचा राजीनामा स्वीकारला आणि शुक्रवार दि. ३ राेजी डाॅ. पटवर्धन यांच्या जागी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) माजी अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांची नियुक्ती केली. मात्र, या निवड प्रक्रियेवर डाॅ. पटवर्धन यांनी आक्षेप घेत शनिवार, दि. ४ राेजी यूजीसीच्या सचिवांना पत्र पाठविले हाेते. त्यामध्ये ‘नव्या अध्यक्षांची नेमणूक परस्पर केली असून, त्याबाबत मला काेणतीही माहिती दिली नाही. ही संपूर्ण प्रक्रिया तत्त्वांच्या आणि सेवा नियमांच्या विरोधात असून, निषेधार्ह आहे, असे म्हटले होते. यूजीसी आणि नॅकमधील घडामोडी या संशयाच्या भोवऱ्यात आहेत. या दोन्ही संस्थांमध्ये अधिकाराचा गैरवापर होत असून, केंद्र सरकारच्याशिक्षण मंत्रालयाने चौकशी करत दाेषींवर कारवाई करावी, असे त्यांनी पत्रात नमूद केले हाेते.
''मी नॅकच्या कार्यकारी अध्यक्षपदाचा राजीनामा देत असून, हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे. - डाॅ. भूषण पटवर्धन''