मोबाईल इंटरनेटमुळे जग एकीकडे मुठीत आले असताना त्याच मोबाईलमध्ये भविष्य पाहणारे उदंड आहेत. समाज त्या अर्थाने विज्ञानाधिष्ठित झालेला नाही. अर्थात तो व्हायलाच हवा असा अट्टहास कशासाठी आवश्यक आहे? यावर खरे म्हणजे डॉ. नारळीकर यांच्याच अध्यक्षतेखाली नाशिकच्याच साहित्य संमेलनात एक खास चर्चा व्हायला हवी. अंधश्रद्धेच्या पायावर चालत आलेल्या अनिष्ट चालिरीती, शोषणाला पायबंद बसला पाहिजे याबद्दल कोणाचेच दुमत असणार नाही. मात्र श्रद्धेच्या बळावर चार बऱ्या गोष्टी घडत असतील तर त्याचे काय, याबद्दल डॉ. नारळीकर या अधिकारी व्यक्तीने मार्गदर्शन करण्याची गरज आहे. संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉ. नारळीकरांनी विज्ञान मराठीत आणण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. राज्य शासनापासून ते थेट खुर्द-बुद्रुकमधल्या शिक्षकांपर्यंत आणि तमाम मराठी पालकांपासून ते प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकाने हा मनोदय गांभीर्याने घेतला पाहिजे. ‘इंग्रजी हीच ज्ञानभाषा’ असल्याचा भ्रम आणि न्यूनगंड बाळगण्याची प्रथा पडल्याने मराठी भाषा समृद्धी आणि वर्धनाकडे लक्ष दिले जात नाही. स्वत: डॉ. नारळीकर, डॉ. बाळ फोंडके, निरंजन घाटे या मोजक्या विज्ञानलेखकांनी वैज्ञानिक मनोरंजनाच्या माध्यमातून मराठीत पर्यायी शब्द रुळवले. त्यापुढे जात आता विज्ञान विषयांचे मराठीकरण करण्याचा कालबद्ध कार्यक्रम सरकारनेच आखला पाहिजे. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठांवर याची जबाबदारी सोपविली पाहिजे. केवळ मातृभाषेतूनच विज्ञान-तंत्रज्ञान शिकणारे जर्मनी, फ्रान्स, स्वीडन, बेल्जियम, रुमानिया यांसारखे अनेक युरोपीय देश जपान, चीन, कोरियासारखे आशियाई देश गणित, विज्ञान, तंत्रज्ञानात आघाडी घेत असल्याचे दिसतात. जगातली अकराव्या क्रमाकांची भाषा बोलणाऱ्या महाराष्ट्रालाही हे अवघड जाऊ नये. खगोलशास्त्रज्ञ असल्याने ग्रह-ताऱ्यांच्या युत्या पाहण्याची सवय डॉ. नारळीकर यांना आहे. त्यामुळेच बहुधा त्यांनी ‘वैज्ञानिक व साहित्यिकांना एकत्र आणणार,’ असे म्हटले असावे. त्यांची ही ‘दुर्दम्य आशा’ सफल होवो, इतकीच शुभेच्छा या बाबतीत व्यक्त करता येईल. एरवी संमेलनाध्यक्षपद म्हणजे औट घटकेचे मिरवणे असते, पण डॉ. नारळीकर यांच्यामुळे शालेय विद्यार्थी-तरुण विज्ञान वाचन-लेखनाकडे वळण्याची शक्यता निर्माण होणे हे आश्वासक आहे.
डॉ. नारळीकर - अग्रलेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 5:22 AM