पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी बचाव पक्षातर्फे मंगळवारी (दि. १९) दोन साक्षीदारांची नावे असलेली यादी न्यायालयात सादर करण्यात आली. न्यायालयाने या दोन्ही साक्षीदारांना समन्स काढले असून, पुढील सुनावणी ५ जानेवारीला होणार आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर आरोप निश्चिती करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या गेल्या सुनावणी दरम्यान सीबीआयने जे पुरावे सादर केले आहेत ते खोटे असल्याचे आरोपींनी न्यायालयात सांगितले होते. त्यावेळी शरद कळसकर, संजीव पुनाळेकर यांनी लेखी म्हणणे सादर केले होते. तर, डॉ. तावडे यांनी सीबीआयच्या अधिकार्यांना साक्ष देण्यासाठी बोलवण्याची मागणी केली होती. त्यावेळी न्यायालयाने पुढील सुनावणीच्या वेळी साक्षीदारांची यादी सादर करण्याचा आदेश बचाव पक्षाला दिले होते. त्यानुसार मंगळवारी (दि. १९) झालेल्या सुनावणी दरम्यान बचाव पक्षाने दोन नावांचा समावेश असलेली यादी सादर केली.
या प्रकरणात सीबीआयने आत्तापर्यंत २० साक्षीदार सादर केले असून, त्यांची उलटतपासणी देखील पूर्ण झाली आहे. गेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरोपींना ३०० पेक्षा जास्त प्रश्न विचारले होते. त्यावेळी आरोपींनी बहुतांश प्रश्नांना माहिती नाही, अशी उत्तरे दिली होती.