पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाला. त्यादिवशी रक्षाबंधन होते. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी आरोपी शरद कळसकर औरंगाबादला तर सचिन अंदुरे अकोल्यात आमच्यासमवेत होते, अशी साक्ष कळसकर आणि अंदुरे यांच्या बहिणींनी शुक्रवारी न्यायालयात दिली. दरम्यान, सीबीआय वकिलांनी साक्षीदारांची उलटतपासणी पुढील तारखेला घेण्यासंबंधी न्यायालयात विंनंती केली. त्याप्रमाणे दि. १६ जानेवारी रोजी खटल्याची पुढील सुनावणी होणार आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अॅड. संजीव पुनाळेकर, विक्रम भावे या पाच जणांवर आरोप निश्चिती करण्यात आली आहे. मागील सुनावणी दरम्यान बचाव पक्षातर्फे दोन साक्षीदारांची नावे असलेली यादी सादर करण्यात आली होती. न्यायालयाने साक्षीदारांना समन्स काढले होते. त्यानुसार शुक्रवारी ( दि. ५) अंदुरे आणि कळसकर यांच्या बहिणींची पी.पी जाधव न्यायालयात साक्ष झाली. दि. २० ऑगस्ट रोजी रक्षाबंधन होते. त्यादिवशी भाऊ शरद हा रक्षाबंधनासाठी आला होता असे कळसकरच्या बहिणीने न्यायालयात सांगितले. तसेच सचिन अंदुरे देखील रक्षाबंधनासाठी अकोल्याला माझ्याकडे आला होता. त्याचा आंतरजातीय विवाह असल्याने त्याच्या लग्नात मध्यस्थी करावी अशी सचिनची इच्छा होती. तेव्हा आई वडिलांना आवडणार नाही. तू असे करू नकोस असे त्याला सांगितल्यावर तो राखी बांधून निघून गेला असल्याची साक्ष अंदुरे याच्या बहिणीने दिली. बचाव पक्षाच्या वतीने वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी काम पाहिले. आता या दोन्ही साक्षीदारांची सीबीआय वकिलांतर्फे दि. १६ जानेवारीला उलट तपासणी घेण्यात येणार आहे. या प्रकरणात सीबीआयने आत्तापर्यंत २० साक्षीदार सादर केले असून, त्यांची साक्ष आणि उलटतपासणी पूर्ण झाली आहे. गेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरोपींना ३०० पेक्षा जास्त प्रश्न विचारले होते. त्यावेळी आरोपींनी बहुतांश प्रश्नांना माहिती नाही, अशी उत्तरे दिली होती.