पुणे : ‘पद्म’ सन्मान मिळालेल्या मान्यवराचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्याचा प्रघात आहे. ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर त्यामुळेच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाल्याचे स्पष्टीकरण सरकारने अलिकडेच दिले होते. मात्र, ज्येष्ठ पुरातत्व शास्त्रज्ञ आणि प्राच्यविद्या पंडित पद्यश्री डॉ. मधुकर केशव ढवळीकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याला शासनाला विसर पडला.पुरातत्व शास्त्राची मुहूर्तमेढ रोवणारे आणि या क्षेत्रातील अभ्यासकांसाठी मार्गदर्शक असणारे डॉ. मधुकर ढवळीकर यांचे दि. २७ मार्च रोजी पुण्यात निधन झाले. डॉ. ढवळीकर यांना २०११ मध्ये ‘पदमश्री’ने सन्मानित करण्यात आले होते. तरीही शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले नाहीत. पद्म पुरस्कारप्राप्त मान्यवराचे निधन झाल्यावर त्यासंबंधीची माहिती जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्री कार्यालयाला कळवायची असते. कोणकोणत्या व्यक्तींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करायचे आहेत याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत. त्यांनी तारतम्य दाखवून यासंबंधी निर्णय घ्यायचा असतो. मात्र, ढवळीकर यांच्या अंत्यसंस्काराबाबत मुख्यमंत्र्यांनी हे तारतम्य दाखविले नसल्याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
डॉ. ढवळीकर यांच्या ‘पद्मश्री’चा शासनाला विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 4:50 AM