आमदार दिलीप मोहिते पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचे षडयंत्र साताऱ्यात नुकतेच उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे एका युवतीने या प्रकरणाचा भांडाफोड केला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, साताऱ्यातील एका युवतीच्या माध्यमातून आमदार दिलीप मोहिते यांना शैलेश मोहिते, राहूल कांडगे यांनी हनी ट्रॅपमध्ये ओढत बदनामी करण्याची भिती दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपायांचा उखळण्याचा डाव आखला होता. त्याबद्दल्यात त्या तरूणीला एक लाख रुपये ॲडव्हान्स दिला होता. आपल्याला आमदार मोहिते पाटील यांची बदनामी करायची आहे. त्यासाठी तुझी मदत पाहिजे असे तरुणीला सांगून तु आमदार मोहिते यांचा पुतण्या मयूर मोहिते यांच्या माध्यमातून आमदार मोहिते यांच्याकडे नोकरी माग व जवळीक वाढव, आमदारांना प्रेमाच्या जाळ्यात ओढ नंतर आपण त्यांना बदनामीची भिती दाखवू प्रकरण पोलिस ठाण्यात नेण्याची भिती दाखविल्यानंतर आपल्याला पैसे मिळतील त्याबद्दल्यात तुला पैसे आणि पुण्यात फ्लॅट घेऊन देतो. या पद्धतीने प्लॅन रचून युवतीला सहभागी होण्यास सांगितले होते. मात्र या हनीट्रॅपबाबत युवतीच्या मनाला न पटल्याबद्दल या युवतीने ठरलेला प्लॅन आमदार मोहिते यांचे पुतणे मयूर मोहिते यांना फोनद्वारे कळविला होता. याप्रकरणी मयूर मोहिते यांनी सातारा येथील पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली असुन तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. शैलेश शिवाजी मोहिते-पाटील (रा. सांगवी, जि.पुणे), राहुल किसन कांडगे (रा.चाकण, जि.पुणे), सोमनाथ दिलीप शेडगे (रा. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या घटनेप्रकरणी व राष्ट्रवादी पक्षाची बदनामी केल्याप्रकरणी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, खेड तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष कैलास सांडभोर, खेड बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ठ नेते अरुण चांभारे, सुखदेव पानसरे, अरुण मुळूक यांनी पत्रकार परिषद घेऊन शैलेश मोहिते, राहूल कांडगे व सोमनाथ शेंडगे यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करून राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. अन्यथा खेड तालुका राष्ट्रवादी पक्षाचे सर्व पदाधिकारी राजीनामा देतील असा इशारा दिला आहे. तसेच याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार व पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस कमिटीला पाठविण्यात आले असल्याचे पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे,तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर यांनी यावेळी सांगितले.
डॉ. शैलेश मोहिते यांची राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी करा, आमदार दिलिप मोहिते यांना हनी ट्रपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 4:09 AM