लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या आठ वर्षांनंतर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, ॲड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर दोषारोप निश्चित करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा कबूल आहे का, असे विचारले असता आरोपींनी गुन्हा नाकारला. त्यावर आता ३० सप्टेंबरला सरकार व बचाव पक्षातर्फे पुराव्यासंबंधीची कागदपत्रे सादर केली जाणार आहेत. त्यामुळे खटल्यास गती मिळणार आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयापुढे बुधवारी ही सुनावणी झाली. कोरोनाचे कारण सांगून आरोपींनी वकील व नातेवाइकांशी संपर्क साधण्यासाठी आरोपनिश्चितीस पुन्हा मुदत देण्याची विनंती न्यायालयाला केली. मात्र, सात सप्टेंबरच्या सुनावणीवेळीच न्यायालयाने पुन्हा मुदतवाढ मिळणार नसल्याचे सांगितले होते. त्याचा पुनरुच्चार न्यायाधीशांनी केला.
या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरे, वीरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीसाठी हजर होते. आरोपी संजीव पुनाळेकर व विक्रम भावे प्रत्यक्ष उपस्थित होते. बुधवारी सुनावणीच्या वेळी आरोपींचे वकील ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी सांगितले की, शरद कळसकर याच्याशी सात दिवसांत बोलणे झालेले नाही. पुढच्या तारखेला त्याला न्यायालयात हजर केले जाईल. त्यावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधील अडचणींमुळे औरंगाबाद कारागृहात असलेला सचिन अंदुरे आणि आर्थर रोड कारागृहात असलेला शरद कळसकर या दोघांना पुण्यातील येरवडा कारागृहात हलविण्याचे आदेश न्यायालयाने दिले. आरोपींनी गुन्हा कबूल केला तरी लगेच सुनावणी सुरू होणार नाही. वकिलांशी विचारविनिमय करायला वेळ दिला जाईल. कोर्टाकडे इतरही खूप खटले आहेत. त्यामुळे दोषारोप निश्चित करण्यासाठी पुन्हा वेळ देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
आरोपी वीरेंद्रसिंह तावडे याने न्यायालयास सांगितले की, माझा चोवीस तासांपूर्वी वकील आणि नातेवाइकांशी संपर्क झाला आहे. वकील आणि मेव्हण्याशी बोलल्यानंतर त्यांच्या मनात शंका निर्माण झाल्या आहेत. पाच वर्षे मी तुरुंगात खितपत पडलो आहे. आता अचानक खटला चालविण्याच्या स्थितीमुळे मला धक्का बसला आहे. याबाबत विचार करायला वेळ मिळावा. आम्हाला प्रतिवाद करण्यासाठी वेळ दिला नाही तर अन्याय होईल. त्यावर दोषारोपपत्रावर वकिलांशी बोलूनच ऑर्डर निघाली आहे. नातेवाइकांशी बोलायला पुरेशी मदत दिली जाईल. केवळ आरोपींना गुन्हा कबूल आहे का ते सांगावे. मात्र, पाचही आरोपींनी गुन्हा कबूल नसल्याचे न्यायालयास सांगितले.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ ला हत्या झाली. या गुन्ह्यात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या दोषारोपपत्रात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर यांच्याविरोधात कट रचणे, हत्या करणे, बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) आरोप ठेवण्यात आले आहेत, तर ॲड. पुनाळेकर आणि भावे यांच्याविरोधात पुरावे नष्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तावडे, अंदुरे आणि कळसकर हे कारागृहात असून, ॲड. पुनाळेकर आणि भावे जामिनावर आहेत.