पुणे : आम्ही उंबरठा केला तेव्हा आम्हाला स्मिताच्या नवऱ्याची भूमिका करणाऱ्यासाठी एका देखण्या पुरुषाची गरज होती. पुरुष हा शब्द मुद्दाम याकरीता वापरतो कारण विजय तेंडुलकरांनी पटकथा लिहिताना बायकांना किती सहन करावा लागतो असा अर्थ लावला होता. याच पटकथेचा दुसरा भाग म्हणजे एक पुरुष आहे. तो तिचा नवरा आहे आणि तो पुरुषासारखा वागतो. गिरीशने या भूमिकेचं आव्हान स्वीकारलं. खरं तर भूमिकेला नकारात्मक छटा होता. संपूर्ण भूमिकेत त्याने पुरुषीपण आणलं होत. काही दृश्यांमध्ये त्याचं पुरुषीपण ठसण्यासाठी त्याला उघडा दाखवलं आहे. अगदी माझे दुसऱ्या बाईशी संबंध आहेत हे सांगतानाही त्याचा पुरुषी अहंकार त्याने दाखवला होता. काही स्त्रियांना तर गिरीशचं कसं नुकसान केलं इतपत त्याचं काम पटलं होतं. पण गिरीशला तो काय करतोय याची पूर्ण जाणीव होती.
१९६०च्या काळात बंगाली रंगभूमी जिथे बादल सरकार. मोहन राकेश हिंदीमध्ये, कन्नड रंगभूमीवर मध्ये गिरीश कर्नाड आणि मराठीमध्ये विजय तेंडुलकर अशा चार समकालीन नाटककारांनी तिथलीच नाही तर एकमेकांच्या भाषांची रंगभूमी अजरामर केली. इतरांची नाटकं स्वतःच्या रंगभूमीवर नेणे आणि आपली नाटकं वेगळ्या भाषेत बसवणे असे प्रयोग झाले. गिरीशबद्दल बोलायचं झाल्यास तो मुळात उमदा, विद्वान, उत्तम अभिनेता आणि प्रयोगशील कलाकार आणि लेखक होता. अनेकदा कलाकार भावनिक असतो.मात्र गिरीश हा अतिशय तर्कशुद्ध बुद्धीने मांडणी करणारा होता. त्याला इतिहासात, पुराणात अधिक रस होता. त्याची नाटकं मिथकावर आधारित असायचं. नाटकात तुघलकसारखं नाटक लिहिणं सोपं नसत. असं नाटक लिहिताना लेखकाची लिखाण शैली बदलते. नटाला स्वतःची शैली बदलावी लागते. तो आजच्या आधुनिकेतचा प्रवक्ता होतास. संगीत अकादमीचा अध्यक्ष असताना त्याला मी जवळून बघितलं आहे. तो सगळ्यांची आठवण ठेवत असे. एकदा म्हणाला, ' जब्बार आपण विठाबाईंना अवॉर्ड द्यायला हवं'. तो अध्यक्ष असतानाच ज्येष्ठ तमाशा कलावंत विठाबाई नारायणगावकर यांना सन्मानित करण्यात आलं. त्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यावर 'हा पुरस्कार तेंडुलकरांना का नाही मिळाला' अशी प्रतिक्रिया दिली होती. यावरून त्याचा साधेपणा दिसतो. मध्यंतरी त्याने ऑक्सिजन सिलेंडर लावून सलमान खानसोबत काम केलं होत.त्यात त्याची कमिटमेन्ट होती. त्याचा जन्म पुण्यातला. उंबरठातलं मराठी स्वतः बोललेला आहे. आधुनिकेतचा व अविष्कार स्वातंत्र्याचा प्रवक्ता, उत्तम मराठी, कन्नड आणि इंग्रजी बोलणारा गिरीश आज नाही याचं अतीव दुःख आहे.
-डॉ. जब्बार पटेल
(गिरीश कर्नाड यांना वाहिलेल्या श्रद्धांजलीमधून साभार)