पुणे : भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत मोहोत्सवाच्या दिवशी डॉ. के. एच. संचेती यांचा भारतीय वैद्यकीय क्षेत्रातील महत्वाच्या ७५ व्यक्तींमध्ये समावेश करण्यात आला आहे. संचेती हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. संचेती यांना भारतीय वैद्यकीय क्षेत्रात महत्वाची कामगिरी करणाऱ्या ७५ सन्माननीय व्यक्तींपैकी एक म्हणून गौरवण्यात आले.
गेली अनेक दशकं स्वतःचे आयुष्य पणाला लावून या ७५ लोकांनी देशाच्या आरोग्यासाठी अतोनात कष्ट घेतले. डॉ. के.एच. संचेती हे त्यापैकीच एक आहेत. त्यांचे या क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय व बहुमोल आहे. हील फाउंडेशन यांनी या ७५ व्यक्तींचे कार्य लोकांसमोर आणण्यासाठी एका ‘कॉफी टेबल बुक’ची निर्मिती केली आहे.
पद्मा डॉक्टर्स कॉन्ग्रीगेशन व भारत सरकारच्या ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ अमृत महोत्सवाच्या निमित्ताने वैद्यकीय क्षेत्रात अमुलाग्र बदल करणाऱ्या या ७५ व्यक्तीचा गौरव करण्यात आला.
पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार विजेते, संचेती हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. के. एच. संचेती, पुणे हे त्यांपैकी एक आहेत. अस्थिरोग क्षेत्रात डॉ. के. एच. संचेती यांनी १२ डिसेंबर १९६५ रोजी काम करण्यास सुरुवात केली. १९६५ मध्ये संचेती हॉस्पिटल सुरु झाले. तेव्हापासून अविरतपणे डॉ. संचेती यांनी ५५,००० पेक्षा जास्त शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. या त्यांच्या बहुमोल व अखंड कार्यामुळे त्यांना पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण या तीनही सर्वोच्च सन्मानांनी गौरवण्यात आले आहे.
या सन्मानासाठी परीक्षक म्हणून या क्षेत्रातील सन्माननीय व प्रसिद्ध व्यक्ती होत्या. प्रमुख अतिथी श्री. डॉ. मनसुख मांडविया, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाची शोभा वाढली. याशिवाय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार यांनीही या सर्व सन्मानार्थी व्यक्तींचे कौतुक केले.
यानिमित्त डॉ. के. एच. संचेती म्हणाले, “अशा दिग्गजांच्या पुस्तकाचा भाग बनणे हा सन्मान आहे. पुरस्कार विजेत्यांनी वर्षानुवर्षे केलेले कार्य प्रेरणादायी आहे आणि भविष्यातील पिढ्यांना निश्चितपणे केलेले कार्य पुढे नेण्याचे बळ मिळेल. समुदायांना निरोगी बनवणे आणि आरोग्यसेवा परवडणारी बनवणे हे आमचे ध्येय आहे. आरोग्यसेवा मिळणे हा अधिकार नाही विशेषाधिकार आहे”