तपासणी व उपचार अविरतपणे सुरू ठेवणार
पुणे : भा. रा. तांबे यांच्या ''ढळला रे ढळला दिन सख्या, संध्याछाया भिवविती हृदया, अतां मधुचे नांव कासया? लागले नैत्र रे पैलतीरी'' या कवितेतील ओळींप्रमाणे भावना मनात दाटून आल्या आहेत. आजवरच्या प्रवासात पैशांपेक्षा लोकांचा कमावलेला विश्वास ही मोठी संपत्ती आहे. या संपत्तीवर कोणताही कर नाही. आजवर सुमारे ५५,००० शस्त्रक्रिया करता आल्या. वाढदिवसाच्या दिवशी शेवटची शस्त्रक्रिया करणार आहे, त्यानंतर फक्त रुग्णांची तपासणी व उपचार मात्र अविरत सुरूच ठेवेन, अशा भावना ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती यांनी ''लोकमत''शी बोलताना व्यक्त केल्या.
डॉ. कांतीलाल संचेती शनिवारी (२४ जुलै) रोजी वयाची ८५ वर्षे पूर्ण करत आहेत. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. २४ जुलै १९३६ हा त्यांचा जन्मदिवस. १९६१ ते १९६५ या कालावधीत केईएम हॉस्पिटलमध्ये निवासी डॉक्टर म्हणून जबाबदारी सांभाळल्यानंतर डॉ. संचेती यांनी १२ डिसेंबर १९६५ रोजी स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली. पोलिओमुळे अपंगत्व आलेल्या मुलांच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यासाठी वेगवेगळ्या गावांमध्ये ते स्वतः जाऊन कॅम्प घ्यायचे. अशा जवळपास १५ ते २० हजार शस्त्रक्रिया त्यांनी केल्या आहेत. डॉ. संचेती यांनी ''इंडस नी'', ''इंडस हिप'' विकसित करत हजारो रुग्णांना नवसंजीवनी दिली. गेली ५५ वर्षे ते अविरतपणे रुग्णांची सेवा करत आहेत. वयाच्या ८६ व्या वर्षात पदार्पण करत असताना आजपर्यंतच्या आयुष्याबद्दल कमालीची तृप्तता आणि समाधान त्यांच्या ठायी आहे.
डॉ. संचेती म्हणाले, ''माझी मुले पराग संचेती आणि मनिषा संघवी वैद्यकीय वारसा अत्यंत उत्तम रीतीने चालवत आहेत, याबाबत कमालीचा आनंद आहे. सर्वच बाबतीत मी अतिशय भाग्यवान ठरलो आहे. पैशांपेक्षा लोकांचा कमावलेला विश्वास मला जगण्याची उर्मी देतो. नशिबाने उत्तम साथ दिली. नशिबाला मेहनतीची, दूरदृष्टीची आणि सर्वांगीण विचारांची जोड देण्यात मी कमी पडलो नाही.''
------
रुग्णांचे उपचार, निदान यामध्ये खूप सुधारणा झाली आहे. नवीन तंत्र, उपकरणे, तंत्रज्ञान यामध्ये आधुनिकीकिरण झाले आहे. पूर्वी हाडांना दुखापत झाल्यास तीन-तीन आठवडे रुग्णांना दवाखान्यात ठेवावे लागत असे. आता तीन दिवसांमध्ये डिस्चार्ज देता येतो. भारत वैद्यकीय सुधारणांच्या बाबतीत इतर देशांच्या बरोबरीने प्रगती करत आहे. अमेरिकेतील ३३ टक्के डॉक्टर भारतीय आहेत. संचेती हॉस्पिटलमध्येही रुग्णांना अद्ययावत उपचार देण्यावर भर दिला जातो. दर वर्षी २० डॉक्टर येथे एमएससाठी येतात. फिजिओथेरपी, हॉस्पिटल मॅनेजमेंट, हॉस्पिटल अँडमिनजस्ट्रेशन याबाबतीत हॉस्पिटलमध्ये विशेष सुविधा विकसित करता आल्या. शस्त्रक्रिया थांबणार असल्या तरी रुग्णसेवेचे व्रत अखंड सुरूच राहणार आहे.
- डॉ. के. एच. संचेती, ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ