डॉ. लीला गोखले यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९१७ रोजी झाला. त्यांनी १९४१ मध्ये मुंबईतील ग्रांट मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसचे, तर १९४५ साली कामा अँड ऑलब्लेस हॉस्पिटलमधून एमडीची पदवी संपादन केली. पुणे विद्यापीठातून १९७३ मध्ये हायर डिप्लोमा इन रशियन लँग्वेज तर २००० साली महाराष्ट्र साहित्य परिषदेतून साहित्य प्राज्ञ ही पदवी प्राप्त केली. पुणे ऑबस्टेस्ट्रिक अँड गायनॅकोलॉजिकल सोसायटीच्या त्या संस्थापक सदस्य होत्या.
ताराचंद रामनाथ आयुर्वेदीय रुग्णालय, सुतिका सेवा मंदिर, माता बाल आरोग्य समिती, कुटुंबनियोजन केंद्र, पुणे महापालिकेचे वाकडेवाडी आणि हडपसर हॉस्पिटल, ओंकारवाडा दवाखाना, पूना विमेन काऊन्सिलचे आरोग्य केंद्र, स्टुडंटस हेल्थ सर्व्हिस स्कीम, पुणे विद्यापीठ अशा अनेक ठिकाणी त्यांनी काम पाहिले. ‘पाळीच्या वेळची पोटदुखी’ याबाबत त्यांनी केलेले संशोधन सर्वमान्य झाले आहे. दोनच वर्षांपूर्वी त्यांच्या ‘माझी गोष्ट’ या आत्मकथनाचे मौज प्रकाशन गृहाच्या वतीने प्रकाशन झाले होते. सेवासदन शाळेतील विद्यार्थिनी ते स्त्रीरोगतज्ज्ञ हा प्रवास त्यांच्या या आत्मकथनातून उलगडला आहे.
कामा रुग्णालयात मानद डॉक्टर म्हणून कार्यरत असताना कम्युनिस्ट कार्यकर्ते बाळकृष्ण गोखले यांच्याशी विवाह केल्याने नोकरी गमावण्याचा अनुभव घेतला. १९५३ ते १९८६ अशी छत्तीस वर्षे स्वत:चे रुग्णालय चालवताना शहरातीलच नव्हे तर पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या वैद्यकीय केंद्रांमधील रुग्णांना सेवा दिली. रुग्णालय बंद केल्यानंतर महिला आणि मुलींच्या आरोग्यासाठी उपयुक्त संशोधनाला त्यांनी वाहून घेतले. आज एकशे तीन वर्षे वयाच्या डॉ. गोखले यांनी वीणकाम, वाचन आणि पाककला अशा अनेक छंदांमध्ये स्वत:ला गुंतवून घेतले.