पुणे : लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने यंदाच्या वर्षी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांची लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे . येत्या १३ ऑगस्ट रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा निमंत्रितांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
पूनावाला समूहाच्या सिरम इन्स्टिट्यूटने कोव्हीशील्ड लशीची निर्मिती करून भारतासह जगभरातील कोट्यावधी नागरिकांना कोरोनापासून संरक्षित केले. विविध प्रकारच्या लसनिर्मितीमधील अग्रगण्य कंपनी असलेल्या ‘सिरम’ने जागतिक स्तरावर मानवी आरोग्याच्या रक्षणार्थ महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत ट्रस्टच्या विश्वस्तांनी डॉ. सायरस पूनावाला यांची यंदाच्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी एकमताने निवड केली आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
या सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रमुख पाहुणे म्हणून तर माजी केंद्रीय मंत्री आणि टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे, महापौर मुरलीधर मोहोळ यांची उपस्थिती राहणार आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात सकाळी १०.३० वाजता हा सोहळा होईल.