डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताला दिवाळखोरीतून बाहेर काढून विरोधकांची तोंडे बंद केली - पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 09:51 IST2025-01-07T09:51:02+5:302025-01-07T09:51:23+5:30

१९९१ ते १९९६ च्या काळात त्यांनी अर्थकारणाची दिशा बदलून दाखवली, डाव्या पक्षांचा, समाजवादी पक्षाचा त्यांना विरोध होता, तरीसुद्धा त्यांनी अमेरिकेसोबत करार केला

Dr. Manmohan Singh pulled India out of bankruptcy and silenced the opposition - Prithviraj Chavan | डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताला दिवाळखोरीतून बाहेर काढून विरोधकांची तोंडे बंद केली - पृथ्वीराज चव्हाण

डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताला दिवाळखोरीतून बाहेर काढून विरोधकांची तोंडे बंद केली - पृथ्वीराज चव्हाण

पुणे : माजी पंतप्रधान नरसिंह राव यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर अर्थमंत्री पदाची जबाबदारी सोपवली. अत्यंत बिकट परिस्थितीत त्यांनी ही जबाबदारी सुद्धा स्वीकारली. त्यांना अतिशय कठोर निर्णय या काळात घ्यावे लागले. डाव्या पक्षांचा त्यांना विरोध होता. परंतु, डॉ. मनमोहन सिंग यांनी सर्वांना समजावून सांगत अत्यंत मोठे क्रांतिकारक बदल केले. डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताच्या अर्थकारणाची दिशा बदलली आहे. त्यांचे हे काम इतिहास कधीही विसरणार नाही, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाल्यामुळे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा आयोजित केली होती. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, वीरेंद्र किराड, राष्ट्रवादीचे अंकुश काकडे, बाळासाहेब दाभेकर, गोपाळ तिवारी, रफिक शेख, दत्ता बहिरट, सौरभ अमराळे, अजित दरेकर, मेहबूब नदाफ आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताला दिवाळखोरीतून बाहेर काढून विरोधकांची तोंडे बंद केली. डॉ. मनमोहन सिंग यांचे अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी अत्यंत सौहार्दपूर्ण संबंध होते. १९९१ ते १९९६ च्या काळात त्यांनी अर्थकारणाची दिशा बदलून दाखवली. डाव्या पक्षांचा, समाजवादी पक्षाचा त्यांना विरोध होता, तरीसुद्धा त्यांनी अमेरिकेसोबत करार केला. त्यांच्या काळात अणुवस्त्र करार पारित झाला, या कराराचा फायदा भारताला मोठ्या प्रमाणावर झाला. त्यांनी या काळात काही आमुलाग्र बदल केले. भारत हा महाशक्ती देश झाला. देशात एक वेगळ्या प्रकारचा ठसा त्यांनी स्वत:च्या कामातून उमटवला. त्यांनी सामाजिक क्षेत्रातील कायदे, माहिती अधिकार, मनरेगा, शिक्षण कायदा अमलात आणले. त्यांनी हक्क दिल्यामुळे अनेक चांगली कामे झाली. त्सुनामी झाली त्यावेळी स्वत: त्याठिकाणी जाऊन पाहणी केली. २००८ चे आर्थिक मंदीचे संकट सोडवले.

केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, डॉ. मनमोहन सिंग ही अशी व्यक्ती आहे की, त्यांचा कोणताही राजकारणी द्वेष करू शकत नाही. त्यांनी कधीही राजकारणी भावनेने आचरण केले नाही. जागतिक स्तरावर आपल्या देशाला मजबूत अर्थव्यवस्था प्राप्त करून दिली. त्यांना पंतप्रधान पदाचा अभिमान नव्हता तर भारतीयांचा सेवक म्हणून अभिमान होता. त्यांच्या जाण्याने देशातील सामान्य माणूससुद्धा हळहळला. स्वच्छ चारित्र्य, स्वच्छ प्रतिमा यामुळे जगाच्या इतिहासात त्यांचे नाव नेहमी अग्रगण्य राहणार आहे. त्यांच्या जाण्यामुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, गणेश पेठेतील गुरूद्वाराचे अध्यक्ष भोलासिंग अरोरा, समाजवादी पक्षाचे जांबुवंत मनोहर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते प्रदीप देशमुख, विश्वांभर चौधरी, मोहन जोशी, ॲड. अभय छाजेड यांची श्रद्धांजलीपर भाषणे झाली. ही सभा सुरू होण्यापूर्वी डॉ. मनमोहन सिंग यांच्या आत्म्यास शांती मिळण्यासाठी सर्वधर्मीय प्रार्थना करण्यात आली. यावेळी राहुल ताथोडे, गजानन जोशी, ज्ञानी मुक्तियार सिंह, भन्ते सुदस्सन, बिशप नरेश अंबाला, मौलाना सईद सय्यद आदी धर्मगुरूंनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली. श्रद्धांजली सभेचे प्रास्ताविक माजी नगरसेवक अविनाश बागवे यांनी केले तर सूत्रसंचालन प्राची दुधाने यांनी केले.

Web Title: Dr. Manmohan Singh pulled India out of bankruptcy and silenced the opposition - Prithviraj Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.