पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील महत्वाचे केंद्र बनलेल्या पालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयामध्ये सुधारणा केल्या जाणार आहेत. कोरोनाचा आजार पुढील ६ ते ८ महिने राहण्याची शक्यता असल्याने या रुग्णांवर औषधोपचार करण्याकरिता तसेच त्या अनुषंगाने काही सुधारणा रुग्णालयाच्यावतीने सुचविण्यात आल्या आहेत. याविषयीचे पत्र आरोग्य विभागाकडून अतिरिक्त आयुक्तांना देण्यात आले आहे.
डॉ. नायडू रुग्णालयामध्ये रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता द्रव्य प्राणवायू प्लांट बसविण्याची शिफारस करण्यात आली असून २०० ते २५० रुग्ण पॉईंटची त्याची क्षमता असणार आहे. यासोबतच वार्ड नं. ६ व ७ ला पाणी पुरवठा करण्याकरिता साठवणूक टाकी तसेच पाणी पुरवठा करणारी उंचावरील टाकी बांधणे, रुग्णालयाच्या परिसरात बोअरवेल करून त्याची जोडणी करून बिल्डींग वरील टाक्यांना जोडण्याचे कामही केले जाणार आहे. यासोबतच रुग्णालयाच्या मुख्य इमारतीचे रंगकाम करण्यात येणार आहे. रुग्णालयाच्या मुख्य इमारतीचे फायबर शेडची गलती बंद करणे, रुग्णवाहिका व सेवकांच्या गाड्यांकरिता पार्किंग करिता शेड उभारणे, वैद्यकीय अधीक्षक सदनिकेचे नुतनीकरण करणे, रुग्णालयाच्या बेसमेंट मध्ये पाणी साचते ते बाहेर टाकण्याची व्यवस्था करणे, रुग्णालयाच्या नावाचा मोठा बोर्ड तयार करून प्रवेशद्वारावर बसविणे, रुग्णालयातील धोबी घाटाचे पत्रे बदलण्याची शिफारस करण्यात आली आहे. रुग्णालयातील सर्व संगणक लॅन (एकत्रित) करणे, बंद पडलेली लिफ्ट सुरू करणे, वार्ड न. ६ व मुख्य इमारती जवळ ऑक्सिजन सिलेंडर ठेवणेसाठी शेड, जाळीचे पार्टिशन, कॉक्रीटीकरण करणे, प्रयोग शाळेत दोन नवीन एसी बसविणे अशी कामे केली जाणार आहेत.
---------
रुग्णाने उंचावरून उडी मारून आत्महत्या करू नये किंवा कोणाला पडल्याने इजा होऊ नये याकरिता दुसऱ्या किंवा पहिल्या मजल्यावर जाळी बांधण्यात येणार आहे. रुग्णाच्या नातेवाईकांना थांबण्याकरिता वॉर्ड क्रमांक सातची जुनी इमारत पाडून तेथे नवीन इमारत उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.