पुणे : सर्व कामे सोडून अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यावर लक्ष केंद्रित करण्याचा मजकूर असलेला मेल हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित एका व्यक्तीकडून डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याला पाठविण्यात आला होता. हा मेल हाती लागल्यानंतर त्याच दिवशी डॉ. तावडे याला अटक केली, अशी साक्ष देणारे सीबीआयचे तत्कालीन तपास अधिकारी एस. आर. सिंग यांची बुधवारी बचाव पक्षाकडून उलटतपासणी घेण्यात आली.
सीबीआयने ज्या कागदपत्रांच्या आधारे आपली बाजू मांडली ती कागदपत्रे उशिरा आम्हाला दिली. तसेच ती फाटलेल्या अवस्थेत होती, असे मुद्दे बचाव पक्षाने मांडत उलटतपासणी घेतली. हत्या झालेल्या दिवशीचा घटनाक्रम त्यांनी मांडला.
घटना घडल्यापासून गुन्ह्याचा तपास कसा केला. खटल्याच्या अनुषंगाने कोणते पुरावे दाखल केले. त्यानंतर दोषारोपपत्रातील माहिती त्यांनी न्यायालयास दिली. फॉरेन्सिक टेस्ट, गौरी लंकेश प्रकरणात शरद कळसकर यांचा जबाब घेण्यात आला होता. त्यातीत मुद्दे त्यांनी नमूद केले. या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर यांच्याविरोधात कट रचणे, हत्या करणे, बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) आरोप निश्चित केले आहेत. त्यांच्यासह ॲड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे अशा पाच आरोपींवर आरोप निश्चिती झाली. आरोपींच्या वतीने ॲड. प्रकाश साळसिंगीकर आणि ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी उलटतपासणी घेतली. या खटल्याची २० एप्रिलपर्यंत दररोज सुनावणी होणार आहे.