पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी राज्याच्या गृह विभागाचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव संजयकुमार यांची सोमवारी साक्ष झाली.
विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, ॲड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे अशा पाच आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले आहे. या प्रकरणातील अंदुरे आणि कळसकर यांच्याविरोधात संजयकुमार यांची साक्ष नोंदविण्यात आली.
सीबीआयने गृह विभागाच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत मंजुरी मागितली होती. त्यांनी ते पत्र अतिरिक्त मुख्य सचिवांना पाठवले. ते पत्र मिळाल्यानंतर त्यांनी ते कनिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविले. त्या पत्राबरोबर पाठविलेल्या कागदपत्रांचा त्यांनी अभ्यास करून रिपोर्ट तयार केला. त्या रिपोर्टवर उपसचिव आणि प्रिन्सिपल सचिवांची सही झाल्यानंंतर तो रिपोर्ट मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांकडे गृहखात्याचीदेखील जबाबदारी होती. त्यांनी तो रिपोर्ट स्वीकारला. त्यानंतर पुन्हा तो रिपोर्ट अतिरिक्त मुख्य सचिवांकडे पाठविण्यात आला. मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळाल्यानंतर त्यांनी ऑर्डर तयार केली. त्यांनी ती सीलबंद करून सीबीआयकडे पाठवली, अशी साक्ष संजयकुमार यांनी दिली असल्याची माहिती सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी दिली. यावेळी बचाव पक्षाच्या वतीने ॲड. प्रकाश साळशिंगीकर यांनी त्यांची उलटतपासणी घेतली.
बचाव पक्षाने मंजुरीचे अधिकार हे सचिवांचे असतात, असे म्हटल्यावर आपण केवळ गृहमंत्र्यांनी सांगितल्यामुळे मंजुरी दिल्याचे संजयकुमार यांनी सांगितले. त्यावर कागदपत्रे पूर्ण वाचली होती का? असे बचाव पक्षाने विचारले असता संपूर्ण कागदपत्रे वाचणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. कोणतीही फाइल ही संबंधित मंत्री आणि कॅबिनेटच्या परवानगीशिवाय मंजूर होत नाही असेही ते आपणहून म्हणाल्याचे ॲड. साळशिंगीकर यांनी सांगितले. दरम्यान, साेमवारपासून (दि. १०) सलग दहा दिवस २० एप्रिलपर्यंत डॉ. दाभोलकर खटल्याची सुनावणी होणार आहे.