पुणे: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या घटनेला २० ऑगस्ट रोजी सात वर्षे पूर्ण होत आहेत. सीबीआय या देशातील प्रतिष्ठित तपास यंत्रणेकडून खुनाचा तपास पूर्ण झालेला नाही, ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. खुनामागील सूत्रधार कोण आहेत हे सीबीआयने शोधून काढले पाहिजे. अन्यथा देशातील विवेकवादी विचारवंत, कार्यकर्ते, पत्रकार यांच्या अभिव्यक्तीला असलेला धोका संपणार नसल्याचे परखड मत मुक्ता दाभोलकर व डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केले.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा 20 ऑगस्ट 2013 रोजी निर्घृण खून झाला. खुनानंतरचे पहिले नऊ महिने महाराष्ट्र पोलिसांनी तपासाची अक्षम्य हेळसांड केल्यानंतर उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे हा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्यात आला. सीबीआयने २०१६ मध्ये संशयित आरोपी म्हणून डॉ. वीरेंद्र तावडे, ऑगस्ट २०१८ मध्ये शरद कळसकर व सचिन अंदुरे आणि मे २०१९ मध्ये संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले. अमोल काळे, अमित डिगवेकर व राजेश बंगेरा या संशयित आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केलेले नाही. खुनाचा तपास डॉ. वीरेंद्र तावडे व अमोल काळे यांच्या नावापर्यंत येऊन थांबलेला आहे. परंतु सूत्रधार कोण आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. खाडीत पिस्तुल सापडल्यानंतर पुढे तपास सरकलेला नाही,याकडे दोघांनी लक्ष वेधले. दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी व गौरी लंकेश या चारही खुनांच्या संदर्भातील शेवटची अटक जानेवारीमध्ये झाली आहे. कर्नाटक एसआयटीने झारखंड येथून ऋषीकेश देवडीकर या तेथे पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या व्यक्तीस लंकेश खुनातील संशयित आरोपी म्हणून अटक केली आहे. यावरून हे खून करणाऱ्या गटाच्या यंत्रणेने किती लांबवर हात पसरले आहेत हे लक्षात येते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
--------------
योगेंद्र यादव यांचे व्याख्यान
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी जवाब दो आंदोलन व व्याख्यान आयोजित करण्यात येते. यंदा ज्येष्ठ राजकीय कार्यकर्ते व स्वराज अभियानचे संस्थापक योगेंद्र यादव यांचे 'करोना के बाद स्वराज का अर्थ' या विषयावरील व्याख्यान २० ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता करोनामुळे फेसबुकद्वारे ऑनलाइन होणार आहे. -------