पानशेतजवळील शिरकोली जंगलात ही वनस्पती सापडली आहे. ज्येष्ठ वनस्पतितज्ज्ञ डॉ. पी. तेताली, केरळच्या वन संशोधन केंद्राचे डॉ. मुरलीधरन, आघारकर संशोधन संस्थेतील शास्त्रम डॉ. मंदार दातार, डॉ. सुजाता तेताली, सारंग बोकील, डॉ. रितेश चौधरी यांनी या वनस्पतीचा शोध लावला आहे. वास्तविक पाहता फुलांशिवाय बांबूची ओळख करणे तसे सोपे काम नव्हते. कारण बांबूला आयुष्यात एकदाच फुले येतात आणि ते ही काहींना ४० ते ६० वर्षानंतर आणि बांबूचे बेट नंतर मरते. डॉ. पी. तेताली यांच्या अनेक वर्षांच्या निरीक्षणामुळे आणि नुकतेच याची फुलं मिळाल्यामुळे वनस्पती वर्गीकरण शास्त्रातील हा गुंता सोडविण्यात या संशोधकांना यश मिळाले आहे. मेस ‘स्पूडोओक्सिनानथेरा माधवी’ आणि माणगा (स्पूडोओक्सिनानथेरा स्टोकसी) यातील महत्त्वापूर्ण फरकदेखील या संशोधनातून उघड झाला आहे. न्यूझीलंडच्या ‘फायटोटॉक्सा’ या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत नुकताच हा शोधनिबंध प्रसिध्द झाला आहे. सह्याद्रीमधील वनस्पती वैभवात या बांबूच्या प्रजातीने भर घातली असून जैवविविधतेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सह्याद्री जंगलांत याला मेस/मेष या नावाने ओळखले जाते. अत्यंत उपयुक्त असलेली ही बांबूची प्रजात स्थानिक लोक गेली अनेक वर्षे विविध गोष्टींसाठी वापर करत आहेत.
————-
मेस म्हणजे मजबूत बांबू
मेस या बांबूचा वापर बांधकामात केला जातो. कारण हा बांबू खूप मजबूज असतो. घरे, फर्निचर बनविण्यासाठीही याचा वापर होतो. पुणे आणि सातारा जिल्ह्यातील जंगलात हा बांबू दिसून येतो.
----------------