पुणे : जनसेवा व्यक्तीविकास प्रतिष्ठानतर्फे यंदाच्या वर्षीपासून शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींना डॉ. पतंगराव कदम शैक्षणिक कृतज्ञता पुरस्कार दिला जाणार आहे. पहिल्या वर्षीचा हा पुरस्कार शिक्षणतज्ज्ञ आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष अरुण निगवेकर यांना मरणोत्तर देण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष आणि जनसेवा व्यक्तीविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मुकेश धिवार यांनी कळवली आहे.
यंदापासून शैक्षणिक क्षेत्रासाठी हा पुरस्कार सुरू केला आहे. सरस्वतीची मूर्ती आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अरुण निगवेकर यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या कामगिरीबाबत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते आणि भारती विद्यापीठाचे कार्यवाह आणि राज्याचे सहकार, कृषी, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, पीआयसीटीचे व्यवस्थापकीय विश्वस्त आर. एस. कोठावळे आणि प्रसिद्ध लेखक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी उपस्थित राहणार आहेत.
कोविडच्या प्रादुर्भावामुळे हा पुरस्कार अरुण निगवेकर यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.