पुणे : ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे (Dr. Prakash Amte) यांच्या तब्येती संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. सध्या डॉ. प्रकाश आमटे न्यूमोनियाची लागण झाली आहे. त्यावर सध्या पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चिंतेची बाब म्हणजे डॉ. आमटे यांना यांना हेअरी सेल ल्युकेमिया ब्लड कॅन्सरचेही निदान झाले आहे.
न्युमोनियावरील उपचार झाल्यानंतर ब्लड कॅन्सरवर उपचार केले जाणार आहेत. पुढील दोन ते तीन आठवड्यानंतर हे उपचार केले जाणार असल्याचे त्यांचा मुलगा अनिकेत आमटे यांनी सांगितले आहे.
डॉ. प्रकाश आमटे हे सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांचे द्वितीय पुत्र आहेत. दि. २३ डिसेंबर १९७३ पासून ते, त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प या नावाने स्थानिक आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवतात, तसेच लोकांनी आणून दिलेल्या जखमी वन्य प्राण्यांवरही ते उपचार करतात.
डॉ. प्रकाश आमटे यांच्या जीवनावर आणि कार्यावर डॉ.प्रकाश आमटे: द रिअल हीरो या नावाचा चित्रपट १० ऑक्टोबर २०१४ रोजी प्रदर्शित करण्यात आला. ह्या चित्रपटात नाना पाटेकर यांनी प्रकाश आमटेंची भूमिका केली असून सोनाली कुलकर्णी, मोहन आगाशे, तेजश्री प्रधान यांच्या आणि २०० गोंड आदिवासी कलावंतांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांत आहे. दिग्दर्शन-निर्मिती ॲडव्होकेट समृद्धी पोरे यांची आहे.