पुणे : ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे (Dr. Prakash Amte) यांच्या तब्येती संदर्भात दोन महिन्यांपूर्वी मोठी बातमी समोर आली होती. आमटे यांना न्यूमोनियाची लागण झाली होती. त्याच वेळी हेअरी सेल ल्युकेमिया ब्लड कॅन्सरचेही निदान झाले होते. त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. अडीच महिन्यानंतर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात येथे कॅन्सर वरील उपचार घेऊन बाबांची तब्येत आता सुधारली असल्याचे अनिकेत आमटे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे. तर पुढील आठवड्यात त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल असंही ते म्हणाले आहेत.
अनिकेत आमटे म्हणाले, बाबांवर ५ केमोथेरपी ने काम केले आहे. दीड महिन्यानंतर त्यांच्या हाताचे प्लास्टरही काढण्यात आले आहे. डॉक्टरांनी दवाखान्यात फॉलोअप साठी बोलावले होते. समाधानकारक सुधारणा असल्याने येत्या शुक्रवारी डॉक्टरांनी नागपूरला जायची परवानगी दिली आहे. तो आनंद वेगळा असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
पुढील काही दिवसांनी डॉक्टरांच्या परवानगीने बाबा सर्वांना भेटू शकतील
मधले काही दिवस त्यांच्यासाठी आणि आमच्या साठी अतिशय खडतर गेले. 2 महिने सलग ताप आणि न्युमोनिया मुळे 9 किलो वजन कमी झाले आहे. असा कुठल्याही प्रकारचा कॅन्सर सारखा भयंकर आजार कोणालाही होऊ नये अशी निसर्गाला प्रार्थना करतो. डीएमएच मधील डॉक्टरांचे अथक प्रयत्न, तेवढ्याच प्रेमाने नर्स आणि स्टाफ यांनी केलेली सेवा आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छा याच मुळे बाबा बरे होत आहेत. कुठल्याही इन्फेक्शनचा धोका होऊ नये म्हणून सध्या गर्दी टाळावी. असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पुढील काही दिवसांनी डॉक्टरांच्या परवानगीने बाबा सर्वांना भेटू शकतील. असे अनिकेत यांनी पोस्टमधून सांगितले आहे.