पुणे :पुणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी, शनिवारीच (दि.१६) सुट्टीच्या दिवशी आयुक्त पदाचा पदभार, मावळते आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून स्वीकारला. यावेळी कुमार यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
पुणे महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर डॉ.भोसले यांनी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, खातेप्रमुख व अन्य अधिकाऱ्यांकडून महापालिकेच्या कामकाजाबाबतचा आढावा घेतला. तसेच पुणे शहरातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन त्या पद्धतीने सर्व अधिकाऱ्यांनी काम करावे असे निर्देश दिले. यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त रवींद्र बिनवडे, विकास ढाकणे, डॉ. कुणाल खेमणार यांच्यासह सर्व उपायुक्त, सर्व खातेप्रमुख, सहाय्यक आयुक्त व अन्य अधिकारी उपस्थित होते.
नागरिक हा प्रशासनाचा केंद्रबिंदू
नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेऊन, त्यांच्या पूर्ततेविषयी आवश्यक त्या उपाययोजनांवर महापालिका प्रशासनाकडून भर दिला जाणार आहे. माझ्या कार्यकाळात नागरिक हा प्रशासनाचा केंद्रबिंदू असेल असे प्रतिपादन यावेळी नवनियुक्त महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
प्रशासकीय अधिकारी व नागरिकांमधील संवाद अधिकाधिक वाढावा यासाठी यापुढे भर दिला जाणार आहे. नागरिकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्या सोडविण्याबरोबरच पायाभूत सुविधांचा विकास याला प्राधान्य देण्यात येणार आहे. अतिरिक्त आयुक्तांसह मी ही नागरिकांच्या भेटीसाठी नेहमी उपलब्ध असणार आहे. महापालिकेकडून आयोजित होत असलेला लोकशाही दिन अधिक सशक्त करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. मुंबई महापालिकेत २००९ ते २०१५ या काळात मी काम केले. या काळात १२ विभागांची जबाबदारी माझ्याकडे होती, त्या अनुभवाचा पुणे महापालिकेत आयुक्त व प्रशासक म्हणून काम करताना नक्कीच फायदा होईल.
महापालिकेत सध्या लोकप्रतिनिधी नाहीत त्यामुळे नागरिक सर्वात महत्त्वाचा घटक केंद्रस्थानी ठेऊन, त्यांना विचारात घेऊन काम करण्यात येईल. लोकसभा निवडणुकीची आचारसहिंता सुरू झाली असली तरी, महापालिकेला विकास कामे करण्यास कोणतीच अडचण येणार नाही. क्षेत्रीय कार्यालय व महापालिकेचे मुख्य कार्यालय यातील समन्वय अधिक वाढविण्यात येणार आहे. सर्व प्रकल्प निर्धारित वेळेतच पूर्ण होतील यासाठी मी आग्रही राहणार आहे. महापालिकेचा नुकताच सादर झालेल्या अर्थसंकल्पाचा अभ्यास करून, उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे डॉ.भोसले यांनी सांगितले.