पुणे : देशाच्या अनेक राष्ट्रपतींनी पुणे शहरावर वेळोवेळी प्रेम दाखवले आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी तर निवृत्तीनंतर पुण्याचेच रहिवासी होण्याला पसंती दिली आहे. देशाच्या पंधरावे राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांची निवड होत असताना त्यांच्याआधीच्या राष्ट्रपतींच्या पुणे भेटीच्या आठवणी प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, काँग्रेसचे माजी आमदार उल्हास पवार व काँग्रेसचे शहर प्रवक्ते रमेश अय्यर यांनी जागवल्या.
स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद सन १९५९ मध्ये पुण्यात आले होते. फर्ग्युसन महाविद्यालयातील एका कार्यक्रमाला ते उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी सहज म्हणून प्रेक्षागृहात पाहिले तर तिथे त्यांना महर्षी धोंडो केशव कर्वे दिसले. डॉ. राजेंद्रप्रसाद लगोलग व्यासपीठावरून खाली उतरले व कर्वे यांच्या आसनाजवळ गेले. तिथे त्यांनी त्यांना खाली वाकून नमस्कार केला.
एपीजे अब्दुल कलाम वानवडी येथील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या एका कार्यक्रमाला उपस्थित होते. गाडगीळ त्या कार्यक्रमाचे निवेदक होते. ते म्हणाले, राजशिष्टाचार असल्याने मी त्यांच्यापेक्षा एक पायरी खाली उभा होतो. कलाम यांनी ते पाहिले व मला नाव घेऊन वर बोलावले. त्यांनी सांगितले की, मी आता एक कविता म्हणणार आहे. तिचे भाषांतर मुलांना ऐकवायचे. त्यांनी ‘माय डिअर चिल्ड्रन’ अशी सुरुवात केली. त्याचे भाषांतर मी ‘माझ्या लेकरांनो,’ असे केले व टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सांगितले की, त्यांनी आधीच त्यांच्याकडे माझे नाव विचारून घेतले होते. कार्यक्रमानंतर कलाम मुलांमध्ये जाऊन बसले. तिथेही त्यांनी मुलांबरोबरच्या त्यांच्या प्रश्नोत्तरांचे भाषांतर करून देण्यास त्यांनी सांगितले.
के. आर. नारायणन यांनीही पुणे शहराला भेट दिली होती. ते कार्यक्रमाला जात होते तिथे खडीचा कच्चा रस्ता होता. संयोजकांनी त्यांच्याजवळ त्यासाठी क्षमायाचना केली. त्यावेळी त्यांच्यासमवेत उल्हास पवार होते. त्यांनी सांगितले की, नारायणन यांनी दिलेले उत्तर कायम लक्षात राहील. ते म्हणाले होते की, काळजी करू नका, मी आयुष्यभर अशा खडीच्या रस्त्यावरून चालत इथंपर्यंत आलो आहे. शंकरदयाळ शर्मा, प्रणव मुखर्जी, प्रतिभाताई पाटील राष्ट्रपतिपदावर असताना त्यांच्याबरोबरही पुण्यातील अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहता आले. सर्वच राष्ट्रपतींना पुण्याविषयी आस्था व जिव्हाळा होता. प्रतिभाताई पाटील यांनी तर राष्ट्रपतिपदाची मुदत पूर्ण झाल्यावर पुणे शहरातच स्थायिक होणे पसंत केले, असे पवार म्हणाले.