पिंपरी : संत आणि लोकसाहित्यांचे व्यासंगी अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत मंगळवारी दुपारी साडेबाराला अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘जय, जय रामकृष्ण हरी...’ या बीजमंत्राचा गजर करीत, टाळ मृदंगाचा गजर आणि संत ज्ञानोबा तुकोबांचे अंभंग गाऊन डॉ. देखणे यांना निरोप दिला. साहित्य, कला, राजकारण, समाजकारण अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आदरांजली वाहिली.
पुण्यातील शनिवार पेठेतील डीएसके चिंतामणी येथे डॉ. देखणे यांचे पार्थिव सकाळी दहाला आणण्यात आले. तेथून आळंदीची दिंडीने अंत्ययात्रा वैकुंठ स्मशान भूमीत पोहोचली. तिथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, खासदार श्रीरंग बारणे, बीव्हीजीचे चेअरमन हणमंत गायकवाड, नाट्य परिषद अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, चंद्रकांत महाराज वांजळे, पुरूषोत्तम महाराज पाटील, साहित्य परिषद कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी, भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, वि. दा. पिंगळे, कवी उद्धव कानडे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. डॉ. देखणे यांचे पूत्र डॉ. भावार्थ देखणे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. हेमंत मावळे यांच्या शांतीमंत्राने अखेरचा निरोप दिला.
''साहित्य आणि कला क्षेत्रातील व्यासंगी अभ्यासक, आमचे मार्गदर्शक हरपले आहेत. त्यांच्या अकाली जाण्याने कला आणि साहित्य क्षेत्राची अपरीमित हानी झाली आहे. -हणमंत गायकवाड (बीव्हीजी)''
''पिंपरी-चिंचवड शहरास सांस्कृतिक लौकीक मिळवून देण्यात डॉ. देखणे यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी अनेक साहित्य संस्थांची उभारणी केली. त्याच्यामुळे साहित्य चळवळ वाढली. -श्रीरंग बारणे, खासदार''
''माणुसपण जपणारा साहित्यिक विचारवंत आणि संतत्व असणारे व्यक्तीमत्व होते. अत्यंत समाधानी आयुष्य जगले. कला साहित्य क्षेत्रात प्रेरणा देण्याचे काम डॉक्टरांनी केले. -भाऊसाहेब भोईर, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद''
''लोकसंस्कृतीचे पायिक, व्यासंगी अभ्यासक, सिद्धहस्त कलेचा उपासक म्हणून सरांनी काम केले. लोककलांच्या माध्यमातून जागल्याची भूमिका त्यांनी बजावली. -चंद्रकांत महाराज वांजळे (कीर्तनकार)''
महाराष्ट्रातील साहित्य आणि कला क्षेत्रात डॉ. देखणे यांचे योगदान होते. वारकरी परंपरचे पायिक त्यांचे जीवन आणि कलासमृद्धपण आम्हाला नेहमी प्रेरणादायी ठरले. -मिलिंद जोशी, कार्यवाह, महाराष्ट्र साहित्य परिषद''