पुणे : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर १९६८ साली तयार करण्यात आलेल्या दुर्मिळ लघुपटाची राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात नुकतीच भर पडली आहे. ‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ या नावाने तयार केलेल्या या लघुपटाची निर्मिती महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी संचालनालयातर्फे १९६८ च्या जुलै महिन्यात करण्यात आली होती. ‘व्हटकर प्राॅडक्शन्स’ या बॅनरखाली निर्मित करण्यात आलेल्या या लघुपटाचे दिग्दर्शन नामदेव व्हटकर यांनी केले होते. सुमारे १८ मिनिटांच्या या लघुपटाला सुप्रसिद्ध संगीतकार दत्ता डावजेकर यांनी संगीत दिले होते तर सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते डेव्हिड अब्राहम यांनी या लघुपटाचे निवेदन केले होते.
नामदेव व्हटकर हे एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले अभिनेते आणि दिग्दर्शक होते. १९५७ साली अभिनेत्री सुलोचना यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘आहेर’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन नामदेव व्हटकर यांनी केले होते. तसेच १९५६ साली प्रदर्शित झालेल्या आणि हंसा वाडकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मुलगा’ या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन व्हटकर यांनी केले होते. याशिवाय १९५२ मध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक राम गबाले यांच्या ‘घरधनी’ या चित्रपटाचे कथालेखन त्यांनी पु. ल. देशपांडे यांच्यासमवेत केले होते.
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती १४ एप्रिल रोजी देशात सर्वत्र उत्साहाने साजरी केली जात असतानाच डॉ. आंबेडकर यांच्यावरील हा दुर्मिळ लघुपट राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे प्राप्त होणे हा एक अपूर्व योगायोग आहे, असे सांगून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम म्हणाले की, या दुर्मिळ लघुपटात डॉ. आंबेडकर यांच्या जीवनातील प्रमुख घटनांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. तसेच त्यांच्या अखेरच्या काळातील काही घटनांचे ‘फुटेज’ पाहायला मिळते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे स्वीकारलेला बौद्ध धम्म तसेच त्यांनी केलेला नेपाळ दौरा याशिवाय मुंबई येथील दादर चौपाटी येथे आंबडेकर यांच्या निघालेल्या अंत्ययात्रेचे ठळक चित्रीकरण या लघुपटात पाहायला मिळते. या लघुपटाचे छायाचित्रण मधुकर खामकर यांनी केले असून जी. जी. पाटील यांनी संकलन केले आहे.
-------------------
या प्रिंटचे लवकर डिजिटायझेशन होईल
‘‘वास्तविक हा लघुपट मुळात ३५ एमएमच्या स्वरूपात होता. परंतु त्याची १६ एमएम स्वरूपातील प्रिंट आम्हाला मिळाली आहे, असे सांगताना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम म्हणाले की, कदाचित ग्रामीण भागात वितरण करण्याच्या हेतूने १६ एमएमच्या प्रिंट्स काढण्यात आल्या असाव्यात. या प्रिंटची सध्याची अवस्था ही मध्यम स्वरूपातील असून त्याचे लवकरच डिजिटायझेशन करण्यात येईल जेणेकरून ती अधिकाधिक प्रेक्षकांना पाहता येऊ शकेल, अशीही माहिती मगदूम यांनी दिली.