पुणे : मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांची उच्च शिक्षण संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधीचे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने हे वैद्यकीय दृष्ट्या अपात्र ठरल्याने त्यांची गच्छंती करण्यात आली असून त्यांच्याकडे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी संदर्भात (असंख्य पद) जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या बाबतचा शासन निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जारी केला आहे.
याआधी धनराज माने यांच्याकडे उच्च शिक्षण संचालनालयाचा पदभार होता. मात्र, त्यांना दृष्टीदोष निर्माण झाल्याने त्यांच्याकडून हे पद काढून घेतले जावे त्यासाठी 'कॉप्स' सह काही संघटनांनी मागणी केली होती. यानंतर माने यांच्या डोळ्यांची तपासणी मुंबईच्या जे.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आली. त्यामध्ये त्यांची दृष्टी कमी झाल्याचे आढळून आले. त्यांना एका डोळ्याने १० टक्केच दिसते. त्यामुळे या पदावर ते कार्यरत राहण्यास सक्षम नाहीत असा अहवाल डॉक्टरांनी दिला होता. म्हणजेच ते वैद्यकीय दृष्ट्या पात्र ठरले नाहीत. त्यामुळे त्यांना हटवले जावे याबाबत मागणी केली जात होती. त्यामुळे शासनाने माने यांची उचल बांगडी केली.
कोण आहेत डॉ. शैलेंद्र देवळाणकर?
नवनियुक्त उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर हे गेल्या दोन दशकांपासून आंतरराष्ट्रीय संबंध आणि परराष्ट्र धोरण विषयावरील राष्ट्रीय ख्यातीचे संशोधक, विश्लेषक आणि स्तंभलेखक आहेत. ते पुणे विद्यापीठातील एम. ए. (राज्यशास्त्र) मध्ये सुवर्णपदक विजेते आहेत. डॉ. देवळाणकर यांनी प्रतिष्ठित स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली येथून एमफिल आणि पीएचडी केली आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंध आणि परराष्ट्र धोरण विषयांवर 20 पुस्तके लिहिली आहेत. नामांकित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये संशोधन लेख प्रकाशित केले आहेत.