पुणे : रंगभूमी गाजवलेल्या नटसम्राटाचे मंगळवारी रात्री निधन झाले. त्यांच्या जाण्याने नाट्यसिनेसृष्टीमध्ये माेठी पाेकळी निर्माण झाली आहे. लागूंचा मुलगा आनंद हा अमेरिकेहून येणार असल्याने त्यांचे पार्थिव दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या (शुक्रवारी) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात सकाळी 10 ते 11 यावेळेत ठेवण्यात येणार आहे.
आपल्या नैसर्गिक अभिनयासाठी आणि विवेकवादी विचारसरणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी डाॅ. श्रीराम लागू यांचे 92 व्या वर्षी राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या जाण्यामुळे नाट्यसृष्टीत माेठी पाेकळी निर्माण झाली. त्यांच्या जाण्याचे वृत्त समजताच अनेक कलाकारांनी त्यांच्या घरी धाव घेतली. लागूंचा मुलगा आनंद हा अमेरिकेहून येणार असल्याने त्यांचे पार्थिव रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. उद्या दुपारच्या सुमारास त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शासनाकडून तसे जिल्हाधिकाऱ्यांना तसेच पाेलीस आयुक्तांना आदेश दिले आहेत.
दरम्यान आपल्या आवडत्या अभिनेत्याला एकदा तरी शेवटचं डोळे भरून पाहाता यावं या इच्छेपोटी ज्येष्ठ रसिकांनी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी रूग्णालयाकडे धाव घेतली. मात्र कुणालाच त्यांचे पार्थिव पाहाता येणार नाही असे सांगितल्याने हिरमूसलेल्या चेह-याने त्यांना परतावे लागले. गेली पाच दशके आपल्या अभिजात आणि समर्थ अभिनयातून नाट्य व चित्रपट क्षेत्रावर अधिराज्य गाजविणा-या या ‘नटसम्राटा’च्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी काही ज्येष्ठ रसिक मंडळीची पावले रूग्णालयाकडे वळली. त्यांना डॉ. लागू यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घ्यायचे होते. ते सुरक्षारक्षकांना तशी विनंती करत होते. मात्र कुणालाही पार्थिव बघता येणार नाही. कुणालाच तिथे जाता येणार नाही असे स्पष्ट सांगण्यात आल्यामुळे रसिकांची निराशा झाली.