पुणे : उच्चशिक्षण विभागाच्या वतीने लवकरच ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक यांच्या नावाने प्राध्यापकांसाठी स्वतंत्र पुरस्कार देण्यात येईल. हा पुरस्कार यंदापासून सुरू केला जाणार आहे, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
पुनर्निर्माण सोशल फाउंडेशन आणि विद्या प्रबोधिनीच्या वतीने गुरूपौर्णिमेनिमित्त आयोजित सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. पाटील म्हणाले की, विविध व्यक्तिमत्त्वांचा परिचय समाजाला होण्यासाठी राजकीय हस्तक्षेप नसलेल्या कार्यक्रमांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. समाजात विविध क्षेत्रात अनेक व्यक्तिमत्त्वे कार्यरत आहेत, त्यांचा परिचय समाजाला होण्यासाठी असे कार्यक्रम झाले पाहिजेत, त्यांचे पूजन केले पाहिजे, कारण त्यांनी आयुष्यभर एक मिशन म्हणून काम केले आहे. अनेकांना मार्गदर्शन, दिशा दिली आहे, अशा व्यक्तिमत्त्वांचा गौरव झाला पाहिजे.
‘जडण-घडण' मासिकाचे मुख्य संपादक व ज्येष्ठ पत्रकार डॉ. सागर देशपांडे यांनी प्रास्ताविकात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिक्षणतज्ज्ञ आणि भारत सरकारचे भूतपूर्व शिक्षण सल्लागार, डॉ. जे. पी. नाईक यांच्या नावे उच्च शिक्षण खात्यामार्फत प्राध्यापकांसाठी पुरस्कार सुरू करण्याची मागणी केली. त्याला लगेच प्रतिसाद देत शिक्षण मंत्र्यांनी या पुरस्काराची घोषणा केली.
या सोहळ्याला ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ अस्थिशल्यविशारद डॉ. के. एच. संचेती, सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, समाजसेवक गिरीश प्रभुणे, लेफ्टनंट जनरल डॉ. डी. बी. शेकटकर (निवृत्त), प्रख्यात मूर्तिशास्त्रज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर, ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ प्रा. श्री. द. महाजन, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, नॅनो शास्त्रज्ञ व माजी उपकुलगुरू डॉ. सुलभा कुलकर्णी, संत साहित्याचे भाष्यकार प्रा. डॉ. अशोक कामत, नामवंत गिर्याराेहक उष:प्रभा पागे, भास्कराचार्य प्रतिष्ठानचे गणिततज्ज्ञ प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी, कृषीतज्ज्ञ डॉ. दत्तात्रय बापट आणि मोरेश्वर जोशी यांचा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना डॉ. माशेलकर म्हणाले की, मी विदेशातून भारतात परतल्यावर 1976 पासून पुण्यात आहे. गेल्या सुमारे ५० वर्षात शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेली, अशी गुरूपौर्णिमा मी पहिल्यांदाच अनुभवतो आहे. अनिरुद्ध दडके यांनी सूत्रसंचालन केले, भालचंद्र कुलकर्णी यांनी आभार मानले. वैशाली जोशी यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.