पुणे: शासनास व क्षेत्रीय कार्यालय यांना मुख्यमंत्र्यांना लिहिलेेले पत्र प्राप्त होण्यापूर्वीच माध्यमांना ते पत्र दिल्याप्रकरणी निलंबित वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान पवार यांना सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी बेकायदा टेंडरसाठी दबाव आणला. तसेच जिल्हा परिषदेचे जुने प्रकरण काढून निलंबनाची कारवाई केली, असे आरोप करणारे पत्र डॉ. भगवान पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. मात्र या पत्रामुळे व त्याच्या प्रसिद्धीमुळे राज्य शासनाची प्रतिमा मलिन झाली आहे, असा ठपका ठेवत राज्य शासनाने डॉ. पवार यांना ही ‘कारणे दाखवा’ नोटीस दिली आहे.
डॉ. पवार यांनी हे पत्र दि. २४ मे रोजी विहित मार्गाने शासनास दिल्याचे सांगितले आहे; पण दि. २५ व २६ मे रोजी शनिवार, रविवार असल्याने सार्वजनिक सुट्टी होती. त्यामुळे हे निवेदन पत्र शासनाकडे दि. २७ मे रोजी प्राप्त झाले. मात्र त्या पूर्वीच पवार यांच्या निवेदनाचे पत्र स्वत:हून माध्यमांना दिले आहे. या पत्राच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकप्रतिनिधींनीही याबाबत समाजमाध्यमांवर पोस्ट केली आहे. यात शासनाची बदनामी झाली असून, पवार यांनी महाराष्ट्र नागरिक सेवा वर्तवणूक नियम १९७९ मधील नियम ३ व ९ चा भंग केल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. या नोटीसमध्ये याबाबत डॉ. पवार यांनी येत्या तीन दिवसांत खुलासा करावा, अन्यथा डॉ. पवार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आला आहे.