पुणे : ऍड-व्हेंचर फाऊंडेशनचा २०२२ सालचा पंधरावा श्री मारूती चित्तमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांना जाहीर झाला. येत्या ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता एस.एम.जोशी फांउडेशन सभागृहात पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे, अशी माहिती फांउडेशनचे विवेक देशपांडे यांनी दिली आहे.
नॅशनल बोर्ड ऑफ वाइल्डलाइफचे सदस्य राजेंद्र केरकर यांच्या हस्ते प्रदान होईल. याप्रसंगी वनमहर्षी मारूती चित्तमपल्ली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असतील. मकरंद केळकर प्रमुख पाहुणे असतील. कार्यक्रमात गाडगीळ यांनी विविध क्षेत्रात केलेल्या कार्याचा जीवनपट, व्याख्यानाद्वारे निसर्गप्रेमींना अनुभवता येईल.
गाडगीळ यांनी पुणे आणि हावर्ड विद्यापीठात जीवशास्त्राचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी परिसर शास्त्र, उत्क्रांतीवादी जीवशास्त्र, निसर्गरक्षण शास्त्र आणि पर्यावरणाचा इतिहास या विविध शाखांत बेंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेद्वारे संशोधन केले. त्यांनी अनेक शास्त्रीय संशोधन व ललित निबंध तसेच सहा इंग्रजी व चार मराठी पुस्तके लिहिली आहेत. त्यांना पद्मभूषण, शांतिस्वरूप भटनागर, टायलर पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.