पुणे : ‘वनराई’ संस्थेचे संस्थापक पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांचा १४ फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘जल-वन-मोहन दिन’ म्हणून साजरा केला जातो. कोंढवा डेव्हेलपमेंट फोरमच्या वतीने या दिवशी ९६ देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.
मार्केट यार्ड-कोंढवा रोड या मार्गावरील गंगाधाम चौक ते श्रीजी लॉन्स या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा हा उपक्रम राबवला गेला. वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, कोंढवा डेव्हेलपमेंट फोरमचे अतुल जैन, सचिन गांधी, धवल सोनी, सम्यक ललवानी, महेंद्र गोयल, सनद जैन, सचिन राठोड, ज्योती पाटील, आनंद अग्रवाल, प्रवीण पटेल आदी यावेळी उपस्थित होते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील म्हणाले की, झाडे जरी संस्थेने लावली असली तरी त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी पोलिस पार पाडतील. अतुल जैन म्हणाले की, निसर्गावर प्रेम करा, निसर्ग तुमच्यावर प्रेम करेल, असे डॉ. धारिया नेहमी म्हणायचे. निसर्ग संवर्धनासाठी आजचा उपक्रम आहे.