पुणे: भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीतर्फे (indian national science academy) स.प. महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विद्या अवसरे यांना 'इन्सा टिचर अवार्ड 2021' जाहीर झाला आहे. पन्नास हजार रुपये रोख आणि शिक्षण विषयक 20 हजार रुपयांची पुस्तके खरेदी करण्यासाठी निधी, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
डॉ. विद्या अवसरे यांनी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. विज्ञान विषयातील अध्यापनात त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. या पुढेही त्यांनी अशाच पद्धतीने काम करावे,अशी अपेक्षा इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीच्या अध्यक्ष चंद्रिमा शहा यांनी व्यक्त केले आहे.
अवसरे म्हणाल्या, सासवड येथून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सावित्रीबाई फूले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातून एमएस्सी पदवी प्राप्त केली. त्यानंतर नोकरी करत मुंबईच्या आयआयटीमधून पीएचडी पदवी प्राप्त केली. गेल्या पंचवीस वषार्पासून मी शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. शिक्षण व विज्ञान क्षेत्रातील संशोधनात दिलेल्या योगदानामुळे तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेऊन या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. सध्या मी पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाची सदस्य आहे.