पुणे : पुणे महानगर नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी प्रत्येक निर्वाचन क्षेत्राची लोकसंख्येनुसार मतदार त्यानुसार निवडून द्यायचे सदस्य संख्या अखेर निश्चित झाले आहे. त्यानुसार या निवडणुकीसाठीची प्रारुप मतदार यादी येत्या १७ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यामध्ये तीन मतदार संघातून ३० सदस्य निवडून देण्यात येणार आहे.
पुणे महानगर नियोजन समितीच्या चार निर्वाचन क्षेत्रातील म्हणजे मोठे नागरी मतदार संघ (महापालिका क्षेत्र), लहान नागरी मतदार संघ (नगरपालिका क्षेत्र), ग्रामीण निर्वाचन मतदार संघ ( जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती), नगरपंचायत क्षेत्र निवडणुकीसाठी निश्चित केले आहे. यापैकी नगरपंचायत देहू आणि वडगाव लोकसंख्या कमी असल्याने निवडणुकीतून वगळण्यात आले आहे. यामुळेच पुणे महानगर नियोजन समितीची निवडणूक तीन निर्वाचन क्षेत्रात होणार आहे. यामध्ये सर्वाधिक 22 सदस्य महापालिका क्षेत्रातून निवडून देण्यात येणार आहेत. तर नगरपालिकेतून एक सदस्य आणि ग्रामीण निर्वाचन क्षेत्रातून 7 सदस्य निवडून देण्यात येणार आहे. या 30 सदस्यासाठी 980 मतदार मतदान करणार आहेत. या निवडणुकीसाठी दोन्ही महापालिकेतील नगरसेवक, पीएमआरडीए हद्दीतील नगरपालिकांचे नगरसेवक, पीएमआरडीए हद्दीतील ग्रामपंचायतींचे सरपंच, पंचायत समित्यांचे सभापती आणि जिल्हा परिषद अध्यक्षा यांना मतदानाचा अधिकार आहे.