पिंपळे गुरव : पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित असलेली कामे अद्याप सुरूच आहेत. विशेष म्हणजे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केलेली रस्ते खोदाई अद्यापही सुरू आहे. पिंपळे गुरवमधील महत्त्वाच्या सर्वच रस्त्यांवर खोदाई सुरू आहे, यामुळे वाहनचालक व नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
अमरसिंह आदियाल म्हणाले की, खोदाईमुळे आणि पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक, शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला आदींना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, वस्तुस्थिती वेगळी आहे. त्यामुळे महापालिकेने अगोदर खोदाई झालेली कामे पूर्ण करावीत आणि नंतर अन्यत्र खोदाई करावी.राजेंद्र जगताप म्हणाले, प्रत्येक काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करणे गरजेचे असते. मात्र, सध्या सर्वच ठिकाणी खोदाई केल्यामुळे नागरिकांच्या समस्यांत भर पडली आहे. त्यामुळे नागरिकांना नेमकी तक्रार कुणाकडे करायची? तक्रारींचा निपटारा करणे गरजेचे असते. प्रशासनाने खोदाई झालेली कामे प्रथम पूर्ण करावीत. नंतर बाकी ठिकाणी खोदाई करावी. रस्त्यांवर पडलेले खड्डे दिसत नाहीत काय?
श्याम जगताप यांनी सांगितले, पावसाळ्यापूर्वी खोदाईची कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे. तरीही सांगवी, पिंपळे गुरव परिसरात अद्याप कामे सुरूच आहेत. खड्डयांनी तर कहरच केला आहे. खोदाई आणि खड्डे यामुळे वाहनचालक व नागरिक त्रासले आहेत. विद्यमान नगरसेवकांचे प्रभागात चाललेल्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे परिसरातील बहुतांश रस्ते चिखलमय झाले आहेत. शिवाजी पाडुळे यांनी याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र आंदोलन करणार असल्याचे सांगितले. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता होती, त्या वेळी अशी गैरसोय कधीच झाली नव्हती. खड्ड्यांमुळे शहरात सातत्याने अपघातात वाढ झालेली आहे.दुरुस्तीच्या नावाखाली खोदाईनवी सांगवीतील एम़ एस़ काटे चौक, रामकृष्ण मंगल कार्यालय ते काटेपुरम चौक, काटेपुरम चौक ते महापालिका शाळा, तुळजाभवानी मंदिर ते सृष्टी चौक या महत्त्वाच्या रस्त्यांवर चेंबर दुरुस्तीच्या नावाखाली खोदाई सुरू आहे़ शिवाय अंतर्गत रस्त्यांवरदेखील अनेक ठिकाणी ही कामे सुरू आहेत. त्यामुळे पिंपळे गुरवमधील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. वाहनचालकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. काम पूर्ण झाल्याशिवाय अन्य ठिकाणी खोदाई करू नये, रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी अपेक्षा त्रस्त नागरिक, वाहनचालक, विद्यार्थ्यांमधून बोलून दाखवली जात आहे.