पुणे : पावसामुळे पर्वती दर्शनमधील घरांमध्ये गटाराचे तसेच मैलापाणी शिरल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. तक्रारी करूनही गटारांची स्वच्छता होत नसल्याबाबत ‘लोकमत’ने बातमी प्रसिद्ध करताच तत्काळ गटार आणि चेंबरची दुरुस्ती करण्यात आली.
या गटारांमधील गाळ काढण्यात आला असून पाणी वाहून जाण्यासाठी ड्रेनेज मोकळे करण्यात आले. वारंवार तक्रार करूनही अधिकारी, तसेच क्षेत्रीय कार्यालयाकडून दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. दोन आठवड्यांपासून चेंबर साफ देण्याची विनंती नागरिकांकडून अधिकाऱ्यांकडे केली जात होती. संचारबंदीमुळे नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही. परंतु, घरातच मैलापाणी घुसल्याने नागरिकांना घरात बसणेही अवघड झाले होते. घरातील लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे ‘लोकमत’ने निदर्शनास आणून दिले होते.