पुणे : रंगभूमी हा आपल्या जगण्याचा एक भाग आहे. त्यातून व्यावसायिक अभिनेते निर्माण होतात हे तर खरे आहे. पण त्यामार्गे आपण संवेदनशील माणूस बनतो हे अधिक महत्त्वाचे आहे. मात्र, आज ‘आपल्याला नाटक अंतर्मनातून जवळचे वाटते का?’ असा प्रश्न पडायला हवा. नाटक म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे. तो आपल्या संवर्धनाचाच एक भाग आहे,असे मत ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांनी व्यक्त केले. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे जागतिक रंगभूमी दिनानिमित्त आयोजित चर्चासत्रात अतुल पेठे यांच्यासह ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष, नाटककार आशुतोष पोतदार, रंगकर्मी रवींद्र सातपुते आणि अमर देवगावकर हे सहभागी झाले होते.‘नाट्य असावे की नसावे’ आणि 'नवीन रंगकर्मींसमोरील अडचणी आणि उपाययोजना’ याविषयांवर सहभागींनी आपआपले विचार व्यक्त केले. ज्योती सुभाष म्हणाल्या, ‘केवळ नाटक किंवा सिनेमात जाणे म्हणजे प्रशिक्षण नव्हे. चांगला माणूस होण्यासाठीसुद्धा प्रशिक्षण गरजेचे असते. त्यातून आपले व्यक्तिमत्त्व विकसित होते. आज प्रत्येकालाच टीव्हीवर काम करायचे आहे; पण अशा हव्यासापोटी प्रशिक्षणाकडे पाहू नका. पालकांनीही आपल्या मुलांबद्दल फार रोमँटिक कल्पना ठेवून याक्षेत्राकडे पाहू नये.’‘नाट्यप्रशिक्षण म्हणजे केवळ अभिनयाचे शिक्षण नव्हे. त्यात इतरही अनेक गोष्टी असणे गरजेचे आहे. अतुल पेठे म्हणाले, दुर्दैवाने आज नाटक म्हणजे केवळ अभिनय असेच समीकरण आपण घेऊन बसलो आहोत. आजच्या महाराष्ट्रात नवे नाट्यलेखक कुठे आहेत? नवे दिग्दर्शक कुठे आहेत? आज महाराष्ट्रात नवे, तरुण संगीत-दिग्दर्शक तरी कुठे आहेत? केवळ अभिनेते म्हणजे नाटक कसे म्हणता येईल? आज मराठी नाटकात नवी फळी तयार होण्यासाठी देखील स्वतंत्र प्रशिक्षणाची गरज आहे. प्रशिक्षण म्हणजे ‘पी हळद अन हो गोरी’ नव्हे! बालपणी नाटक पाहण्यातून खरे नाट्यशिक्षण सुरू होते; पण नाटक करायचे असेल, तर नाटक सतत पाहणे आवश्यक आहे. प्रशिक्षणात नाटकाकडे पाहण्याचा एक स्वतंत्र दृष्टिकोन विकसित केला जातो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सातपुते म्हणाले, प्रशिक्षण घेतले म्हणजे आपण अभिनेता झालो असे नाही. खरे नाटक स्पर्धा आणि बक्षिसे यांच्यापलीकडे असते. ‘पुरुषोत्तम’ आणि ‘फिरोदिया’च्या पलीकडे जाऊन स्वत:चा आणि स्वत:च्या नाटकाचा शोध आपण घेतला पाहिजे.पोतदार म्हणाले, ‘नाट्यप्रशिक्षण कसे असावे, यावर अधिक विचार व्हायला हवा; शिवाय आजच्या युवकांना नाटकातून जगण्याचे स्रोतही शोधता यावेत, ही गरज आहे.
नाटक मनोरंजन नव्हे संवर्धनाचा भाग : ज्योती सुभाष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 7:23 PM