मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक व खासदार अमोल कोल्हे यांच्या जळगावसह अन्य ठिकाणी प्रचार सभा होती. त्यानुसार त्यांनी बोदवड व एरंडोल येथे सभा घेतली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हेलिकॉप्टर क्रॉस मार्ग होऊ नये, यासाठी अमोल कोल्हे यांच्या हेलिकॉप्टरला लँडिंग व टेकऑफला परवानगी नाकारण्यात आली. अमोल कोल्हेंच्या अनेक ठिकाणच्या सभा रद्द करण्यात आल्या.
मोदींच्या सभेमुळे आमच्या प्रवासाला अडथळा निर्माण झाला असून देशाच्या पंतप्रधानांनी एका पक्षाच्या प्रचारासाठी का यावं? असा सवाल अमोल कोल्हेंनी विचारला. कोल्हेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करत सभेला जाता न आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, पिंपरी चिंचवडमधीलचिंचवड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राहुल कलाटेंच्या प्रचारार्थ अमोल कोल्हे पिंपरी चिंचवडमध्ये सभा घेणार होते. मात्र, मोदींच्या पुणे दौऱ्याचा फटका कोल्हेंना सहन करावा लागल्याने त्यांची सभा रद्द झाली. तरीही, डॉ.अमोल कोल्हेंनी चक्क रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून मोबाईलवरुन तेथील जनतेशी संवाद साधला. मोबाईलवरुन अपक्ष उमेदवाराचं कौतुक करत, भाजपा-शिवसेना सरकारवर तोफ डागली. अमोल कोल्हेंचा हा रस्त्यावरील व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. डिजीटल तंत्रज्ञानाची उपयोग करून, अशक्य ते शक्य करणाऱ्या अमोल कोल्हेंची ही सभा राजकीय इतिहासातील पहिलीच सभा असेल, जी प्रमुख प्रचारक नेता चक्क रस्त्यावरुन आणि दुसऱ्या ठिकाणाहून उपस्थित जनतेशी संवाद साधत आहेत.
मोदींची पुण्यात सभा असल्यानं मला परवानगी नाकारण्यात आली. पिंपरी, चिंचवडच्या सभा मोदी पुण्यात असल्यानं मला रद्द कराव्या लागल्या. देशाचे पंतप्रधान एका पक्षाच्या प्रचाराला येत असल्यानं त्या प्रोटोकॉलमुळे इतर पक्षांना प्रचारापासून वंचित ठेवण्यात येत आहे, असा आरोपही कोल्हेंनी यावेळी केला. इतर पक्षांना प्रचार करणं नाकारलं जातंय. हे कितपत लोकशाहीच्या तत्त्वांना आणि मुल्यांना धरून आहे, याविषयी खरंतर संभ्रम निर्माण झाल्याखेरीज राहत नाही, असेही ते म्हणाले.