पुणे : सरकारी काम आणि सहा महिने थांब, ही युक्ती सर्वच ठिकाणी लागू होते. रेशन कार्ड काढतानादेखील हाच अनुभव सामान्य लोक घेत होते. त्यातही एजंटांना पैसे खाऊ घातल्याशिवाय रेशन कार्ड मिळत नव्हते. त्यामुळेच रेशन कार्यालयांमधून एजंटांचा सुळसुळाट दिसत होता. आता याच एजंटांच्या मनमानीला लगाम घालण्यात आला आहे. रेशन कार्ड आता ऑनलाइन आणि नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे सामान्यांचा त्रास कमी होणार आहे.
रेशन कार्ड काढण्यासाठी एजंटांना हाताशी धरल्याशिवाय पर्याय नाही, असे चित्र होते. अनेक तहसील व परिमंडळ कार्यालयांमध्ये एजंटांचा सुळसुळाट झाला होता. त्यात अनेक अधिकारीही सामील होते. त्यामुळे सामान्यांना वीस रुपयांत मिळणाऱ्या रेशन कार्डासाठी दोन हजार रुपये मोजावे लागत होते. आता याला चाप बसणार आहे. राज्य सरकारने बुधवारी जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार आता सामान्यांना रेशन कार्ड ऑनलाइन आणि नि:शुल्क काढता येणार आहे.
ऑनलाइन अर्ज केल्यानंतर ही माहिती संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा अन्नधान्य वितरण अधिकाऱ्याकडे जमा होईल. त्यानंतर अर्जदार नेमका कुठल्या वर्गातील आहे, यावरून त्याचे रेशन कार्ड किती दिवसांत मिळेल हे ठरेल. अर्जदार अंत्योदय योजनेतील किंवा राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील असल्यास पूर्वीप्रमाणेच रेशन अधिकारी त्याच्या कुटुंबाचा सर्व्हे करतील. त्यामुळे असे रेशन कार्ड देताना पूर्वीचीच २० दिवसांची मुदत लागेल. पांढऱ्या रेशन कार्डासाठी पूर्वीप्रमाणेच आताही सात दिवसच लागणार आहेत. रेशन कार्ड मान्य झाल्यानंतर ते ऑनलाइनच डाउनलोड करता येईल. कार्ड कोणत्या दुकानदाराकडे देण्यात आले आहे याचा उल्लेखही त्यात असेल.
याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने म्हणाल्या, “या पद्धतीमुळे सामान्यांना होणारा त्रास वाचणार आहे. माहिती ऑनलाइनच उपलब्ध झाल्याने पुढील सोपस्कार कमी होणार आहेत.” तर रेशन कार्ड दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणेश डांगी म्हणाले, “रेशन कार्ड काढण्यासाठी पूर्वी अधिकारी, कर्मचाऱ्यांसह एजंटांची लॉबी होती. ऑनलाइन सुविधेमुळे ही लॉबी तुटेल.”