पुणे : ‘डीआरडीओ’चा संचालक डॉ. प्रदीप कुरूलकर याने मोबाइलवरील व्हॉट्सॲप ॲप्लिकेशन डिलीट केले होते. त्यामुळे न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेला मोबाइल डिकोड करता आला नाही. राज्य दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) मोबाइल ताब्यात घेऊन फिजिकली कुरूलकर याचे सीमकार्ड ‘६ टी’मध्ये टाकून रीतसर पासवर्डद्वारे मोबाइल सुरू केला. त्यानंतर व्हॉट्सॲप डाऊनलोड करून त्याच्या क्रमाकांचे व्हॉट्सॲप ॲक्टिव्हेट केले व त्याचा बॅक अप घेण्यात आला. अशा प्रकारे पाकिस्तानी महिला हेराबरोबर कुरूलकर याचे झालेले चॅट रिकव्हर करण्यात आले असल्याची माहिती एटीएसच्या अहवालातून समोर आली आहे.
पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून कुरूलकर याला अटक करण्यात आली आहे. एटीएसने केलेल्या तपासातून अनेक बाबी समोर येत आहेत. हा देशाच्या विरोधातील गंभीर गुन्हा असून, त्याची व्याप्तीही मोठी असल्याचे एटीएसच्या तपासी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे कुरूलकर याच्यावर देशविघातक कारवाई केल्यासंबंधीचे (यूएपीए) कलम लावले जावे, अशी मागणी विविध संघटनांकडून केली जात आहे. मात्र, सध्या तरी मोबाइलमधील छायाचित्रे, त्यामधील संवेदनशील माहितीचे स्क्रीनशॉट काढण्यात आले आहेत. मोबाइल न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला आहे. सायबर सेलकडूनही तपास सुरू आहे. त्याचा अहवाल मिळणे अद्याप बाकी आहे. गोपनीय माहिती जर कुरूलकरने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला पुरविल्याचे सिद्ध झाल्यास ‘यूएपीए’चे कलम लागू शकते, असे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
कुरूलकरची पॉलिग्राफ चाचणी होण्याची शक्यता
डॉ. प्रदीप कुरूलकर याची राज्य दहशतवादीविरोधी पथकाकडून (एटीएस) पॉलिग्राफ चाचणी केली जाण्याची शक्यता आहे. एटीएसकडून न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे, की कुरूलकर याची पॉलिग्राफ चाचणी करण्याबाबत कुरूलकर व त्याच्या पत्नीला माहिती देण्यात आली आहे. त्यासाठी आरोपीचे संमतीपत्र आवश्यक असते. कुरूलकरच्या वकिलांशी याबाबत चर्चा केली आहे. आरोपीचे संमतीपत्र घेऊन न्यायालयाच्या आदेशान्वये पॉलिग्राफ चाचणी करणार आहोत. याला एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे.