..........................
सूस गाव :२
.......................................
दीपक मुनोत/ लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे :पुण्याच्या आसपासच्या बहुतांश गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. त्याला सूस गावही अपवाद नाही. पायाभूत सुविधा उपलब्ध होणार असतील आणि पाण्याचा प्रश्न सुटणार असेल ग्रामस्थांचे विलीनीकरणास ना नाही. या परिस्थितीत ग्रामस्थ आजही द्विधा मन:स्थितीत आहे.
गावात पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव असून, पाणी प्रश्नाबरोबरच नागरिकांनी वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याची तक्रार ''लोकमत''शी बोलताना केली. जागोजागी विजेचे खांब नादुरुस्त असून केबलचेही काम अर्धवट आहे.
ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या 3 कोटी रुपयांच्या महसुलातील मोठा हिस्सा हा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) ला जातो. पण गावात रखडलेल्या कामांना निधी देण्याविषयी प्राधिकरणाने नेहमीच उदासीनता दाखवली आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात स्मशानभूमी आणि शाळेसाठी जागा उपलब्ध व्हावी म्हणून अनेकदा प्रयत्न केले गेले पण उपयोग झाला नाही.
गावातील अनेक विद्यार्थी हे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या खेळातून नावारूपाला आले आहेत, पण त्यांना खेळण्यासाठी मैदानच उपलब्ध नसल्याने गावातील विद्यार्थी आणि खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली.
आमचे गांव पुणे महापालिकेत समाविष्ट झाले तर आमच्यावर अतिरिक्त कर वसूल करण्यात येईल, त्यामानाने सुविधा मिळतील की नाही यावरही प्रश्नचिन्ह आहेच. यापूर्वी, अकरा गावं महापालिकेत समाविष्ट करण्यात आली होती, त्यांची आज काय अवस्था आहे हेही बघीतलं गेलं पाहिजे. त्यांची जी अवस्था आज आहे ती आमची भविष्यात होऊ नये, अशी भीतीदेखील गावातील नागरिकांनी व्यक्त केली.
नियोजित विकास आराखड्यात आरक्षण पडल्यास, आमच्या जागांची बाजारभावानुसार किंमत मिळावी, अशीही मागणी नागरिकांनी केली.
............................
प्राथमिक शाळा पत्र्याच्या खोलीत भरते. शाळा आणि अंगणवाडीसाठी जागा नसल्याने मुलांना आम्ही शिकवण्यासाठी पाठवायचे कुठे? महानगरपालिकेने ही दूर करावी.
- एक पालक
.........................
लॉकडाऊनमध्ये आमच्यासारख्या लघू उद्योग करणाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ग्रामपंचायत अथवा प्रशासनकडून कुठलीही मदत मिळाली नाही. महापालिकेने आम्हाला मदत करावी.
- युवराज सामाले, गॅरेज चालक.
.........
गावाच्या मुख्य रस्त्यावर पावसाळ्यात पाणी साचते. परिणामी संपूर्ण रस्ता बंद असतो. दररोज संध्याकाळी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत रस्त्यावर मोठी वाहतूककोंडी होत असल्याने मनस्ताप सहन करावा लागतो. महानगरपालिकेने रस्तारुंदीकरण प्राधान्याने करावे.
- संदीप नाईक, व्यावसायिक
...................................
(उद्याच्या अंकात : महाळूंगे)
.......
फोटो आहे