पुणे : खडकवासला धरणातून पर्वती जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत बंद पाइपने पाणी आणण्याचे महापालिकेचे स्वप्न अखेर प्रत्यक्षात आले आहे. २८ एप्रिलला सकाळी या योजनेचे उद््घाटन होत असून, त्याच दिवशी लगेचच पर्वती जलशुद्धीकरण केंद्र ते लष्कर पाणीपुरवठा केंद्रापर्यंत असेच बंद पाइपने पाणी नेण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.महापौर प्रशांत जगताप यांनी ही माहिती दिली. पुण्याची पाणी योजना झाल्यापासून खडकवासला धरणामधून पर्वतीपर्यंत खुल्या कॅनॉलमधूनच पाणी येत होते. हे अंतर साधारण १३ किलोमीटर आहे. यात बऱ्याच पाण्याचे बाष्पीभवन होत असे. त्याशिवाय कॅनॉलमध्ये कचरा पडायचा, तो तसाच केंद्रात यायचा. अन्य प्रकारचे प्रदूषण व्हायचे ते वेगळेच. कॅनॉलमधून पाणी झिरपून जाण्याचे प्रमाणही बरेच होते. कॅनॉलमधून अनेक ठिकाणी बेकायदा पाणी उचलले जायचे, कॅनॉलला भेगा पडून पाण्याची गळती होत असे. त्यामुळे महापालिका गेली अनेक वर्षे कॅनॉलऐवजी बंद पाइपमधून पाणी आणण्याच्या प्रयत्नात होती. या कामात सातत्याने अनेक अडथळे निर्माण होत होते; मात्र प्रशासनाने त्यावर मात करीत २०० कोटी रुपयांची ही योजना पूर्ण केली आहे. बंद पाईपमुळे आता पाण्याची शुद्धता करण्यासाठी येणाऱ्या पालिकेच्या खर्चात तर बचत होईलच, शिवाय वर्षभरात साधारण १ टीएमसी पाणी वाचेल. पाणीटंचाईच्या सध्याच्या काळात हा सर्वांत मोठा फायदा आहे, असे महापौर जगताप यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पाइपलाइनने पाणी आणण्याचे स्वप्न साकार
By admin | Published: April 26, 2016 1:09 AM