शिक्रापूर : शिक्रापूर परिसरातील विहिरींनी तळ गाठला असून नदीचे पाणीही आटले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याची टंचाई कमी करण्यासाठी येथील वेळ नदीला पाणी सोडावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पावसाळ्यापूर्वी पाणीटंचाईची समस्या कायमस्वरूपी दूर व्हावी यासाठी उपाययोजना म्हणून ग्रामपंचायत सदस्यांनी विहिरीतील गाळ काढण्याचे काम सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुस्लिम स्मशानभूमीशेजारील आडातील गाळ काढण्याचे काम चालू करण्यात आले. त्याचबरोबर नदीच्या कडेच्या विहिरी व मुस्लिम स्मशानभूमी जवळील आड हे दोन्ही एकमेकांना जोडून उपलब्धतेनुसार त्यांचे पाणी विविध विभागांमध्ये वापरता येईल यासाठी काम सुरू करण्यात आले आहे.
यावेळी शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे, उपसरपंच सुभाष खैरे, ग्रामपंचायत सदस्य रमेश थोरात व मयूर करंजे व ग्रामस्थ उपस्थित होते.
-
चौकट
नदीत पाणी सोडण्यासाठी अधिकाऱ्याला घेराव
--
विहिरीचा गाळ काढून त्याची खोली वाढविली, तरी विहिरींच्या पाण्याचे मुख्य स्रोत ही गावातून वाहणारी वेळ नदी आहे. ती कोरडीच राहिल्यास विहिरीत पाणी येणार नाही. त्याामुळे विहिरी भरायचे असल्यास वेळ नदीत पाणी सोडावे लागेलच अशी मागणी ग्रामस्थांनी केली. याबाबत उपसरपंच सुभाष खेरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी प्रशासन अधिकाऱ्याला घेराव घातला. त्यावेळी वेळ नदीत दोन दिवसांत पाणी सोडण्यात येईल, अशे आश्वासन देण्यात आले.
--
फोटो क्रमांक : १० शिक्रापूर पाणीटंचाई
फोटो. ओळी : शिक्रापूर येथील विहिरीतील गाळ काढण्याचे सुरू असलेले काम.