सुनील राऊत, पुणेदर वर्षी उन्हाळ्यात पुणेकरांना पाणीकपातीमुळे पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना, शहरात सुरू असलेल्या सिमेंटच्या रस्त्यांसाठी मात्र बेकायदेशीर टॅप मारून राजरोसपणे पिण्याचे लाखो लिटर पाणी या रस्त्यांसाठी दिवसाढवळ्या वापरले जात आहे. विशेष बाब म्हणजे शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये हा प्रकार राजरोसपणे सुरू असून सर्वसामान्यांना नळजोड द्यायला महिना महिना वेळ खाणारे महापालिका प्रशासन या ठेकेदारांच्या बेकायदेशीर नळजोडांकडे दुर्लक्ष करीत आहे.गेल्या काही वर्षांत शहरात सिमेंटचे रस्ते करण्याची टूम आली आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा खर्च करून केवळ नगरसेवकांच्या मनमानीसाठी हे रस्ते केले जात आहेत. प्रामुख्याने गेल्या काही दिवसांपासून शहरात जणू काही जमिनीखाली सोन्याची नाणी सापडत असल्यासारखी खोदाई सिमेंटच्या रस्त्यांसाठी सुरू आहे. या रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता भासते. त्यामुळे हा रस्ता तयार करताना, त्यासाठी लागणारे पाणी आणि ते पिण्याचे असणार नाही, याची जबाबदारी महापालिकेकडून संबंधित काम करणाऱ्या ठेकेदारावर देण्यात आलेली असते. मात्र, या ठेकेदारांकडून चक्क कामासाठी पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्यांना टॅप मारून अनधिकृत नळजोड घेतले आहेत. या रस्त्यांसाठी प्रत्येक १०० मीटरवर टॅप घेण्यात आल्याची बाब ‘लोकमत’ने गुरुवारी शहरात केलेल्या पाहणीत दिली असून, त्यात प्रामुख्याने कुसाळकर पुतळा चौक ते रत्ना हॉस्पिटल चौक आणि गोखलेनगर परिसर तसेच कसबा पेठेतील फणी आळी परिसरात राजरोसपणे नळजोडांना पाईप लावून पाणी घेतले जात आहे. तर, फणी आळी परिसरात थेट जलवाहिनीला टॅप घेऊन पाणी वापरले जात आहे. अशीच स्थिती शहरातील उपनगरांमध्येही सुरू आहे. मात्र, या रस्त्यांच्या कामाची पाहणी करण्यासाठी पालिकेची असलेली यंत्रणाही त्याकडे डोळेझाक करत असल्याने पुणेकरांच्या तोंडचे पाणी रस्त्यांसाठी पळविले जात आहे.
सिमेंट रस्त्यासाठी पिण्याचे पाणी
By admin | Published: April 03, 2015 3:31 AM