पुणे : धरणक्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याची वर्षभराची चिंता मिटली आहे. खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरणांत आतापर्यंत १७.२१ टीएमसी म्हणजे ५९.०३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांना पिण्याच्या पाण्यासाठी वर्षभर पुरेल एवढा हा पाणीसाठा धरणात जमा झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३.२७ टीएमसीने म्हणजे ११.१८ टक्के पाणीसाठा कमीच आहे. त्यामुळे शहरात दर गुरुवारी सुरू असलेली पाणीकपात आणखी काही दिवस कायम राहणार आहे. दि.१ ऑगस्टनंतर धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पाणी कपातीबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.
राज्यात जून महिन्यात पावसाने चांगलीच ओढ दिली होती. आता जुलै महिना निम्मा संपत आला असताना काही पावसाने पुन्हा जोर धरला आहे. गेल्या आठवड्यापासून पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू आहे. यामुळे सोमवारी (दि.२४) सायंकाळी ५ वाजेपर्यंत या चारही धरणांत १७.२१ टीएमसी पाणीसाठा जमा झाल्याची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी याचदिवशी चारही धरणांत मिळून एकूण २०.४८ टीएमसी म्हणजे, ७०.२१ टक्के पाणीसाठा होता.
पुणे शहरासाठी खडकवासला धरण साखळीतून ११.६० टीएमसी, समाविष्ट गावासाठी १.७५ टीएमसी, भामाआसखेड धरणातून २.६७ टीएमसी आणि पवना धरणातून ०.३६ टीएमसी पाणी देण्यात येते. या मंजूर कोट्याव्यतिरिक्त पालिका खडकवासला धरण साखळीतून जादा पाणी उचलते. मंजूर कोटा आणि अतिरिक्त, असे एकूण १६ टीएमसी पाणी पुणे शहरासाठी खडकवासला धरण साखळीतून घेण्यात येते. सध्या या चारही धरणांत एकूण १७.२१ टीएमसी पाणीसाठा आहे.
गुरुवारी होणारी पाणीकपात कायम
खडकवासला धरण साखळीत १७.२१ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे; पण शहरात दर गुरुवारी होणारी पाणीकपात कायम राहणार आहे. १ ऑगस्टनंतर धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेऊ. यानंतर पाणी कपातीबाबतचा निर्णय घेण्यात येईल. -विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका
सात दिवसांत धरणात ८ टीएमसी पाणी
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणात १७ जुलै रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत ८.८८ टीएमसी पाणीसाठा होता. त्यानंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत १७.२१ टीएमसी पाणीसाठा आहे. त्यामुळे सात दिवसांत धरणात ८.३३ टीएमसी म्हणजेच दुपटीने पाणीसाठा जमा झाला आहे.
धरणांतील सद्य:स्थिती
धरण टीएमसी टक्केखडकवासला १.६१ ८१.४३पानशेत ६.७० ६२.८९वरसगाव ७.३९ ५७.६८टेमघर १.५१ ४०.७१
एकूण १७.२१ ५९.०३